आसराबारी येथे 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ यावल, तालुका प्रतिनिधी...
आसराबारी येथे 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
शासनांच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने आणि 'लोकाभिमुख प्रशासन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व जनसेवेचा संकल्प' या ध्येयानुसार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या वतीने आसराबारी (ता. यावल, जि. जळगाव) येथे 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' एका विशेष लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. आमदार श्री. अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार हे शिबिर पार पडले.
या शिबिरामुळे विविध शासकीय विभागांचा समन्वय साधून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, विविध दाखल्यांचे वितरण, आरोग्य तपासणी आणि अनेक शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या. तसेच गावातील पाणीपुरवठा, वीज आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
शिबिरात विविध विभागांमार्फत झालेले लाभ व सेवा वितरण:
* आदिवासी विकास विभाग: २ बचत गटांना व ३ वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले.
* महसूल विभाग: १० लाभार्थ्यांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले.
* ग्रामविकास व पंचायत राज विभाग: ३० मनरेगा जॉब कार्ड, १० जन्म दाखले आणि १ मृत्यू दाखल्यासंदर्भातील सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
* पुरवठा व इतर योजना: १४ लाभार्थ्यांना रेशन कार्डचे वाटप, २ लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांसंदर्भात तर १ लाभार्थ्याला 'संजय गांधी निराधार योजने'अंतर्गत सेवा देण्यात आली.
* कृषी विभाग: २५ महिला शेतकऱ्यांना 'महिला शेतकरी योजने'ची माहिती देण्यात आली, तर ३० लाभार्थ्यांना सेंद्रिय शेती व खेती बचाव योजनेबाबत मार्गदर्शन मिळाले.
* आरोग्य व वैद्यकीय सेवा: सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे १६ गोल्डन आभा कार्ड व ९ आभा कार्डसंदर्भातील सेवा देण्यात आली. तसेच डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अनुक्रमे ३२ आणि ६९ अशा एकूण १०१ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
* पशुसंवर्धन विभाग: वैरण योजनेंतर्गत ५ लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
* भूमी अभिलेख व सेतू केंद्र: भूमी अभिलेख विभागामार्फत १२ लाभार्थ्यांना मार्गदर्शन तर सेतू सुविधा केंद्र, वड्री येथे उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी ३ अर्ज प्राप्त झाले.
नागरिकांचा वेळ व श्रम वाचले
या शिबिरामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची आवश्यकता उरली नाही, ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ आणि श्रम वाचण्यास मोठी मदत झाली. एकाच छताखाली विविध सेवा मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या उपक्रमासाठी श्री. बबनराव काकडे (प्रांत अधिकारी, फैजपूर), श्री. अरुण पवार (प्रकल्प अधिकारी, यावल), श्रीमती मोहनमाला नाझीरकर (तहसीलदार, यावल), श्री. प्रवीण दाभाडे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी), तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक जनप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शासनाचे हे अभियान शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचत असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रवीण दाभाडे यांनी सांगितले.

No comments