वाढदिवसाचा अनोखा उपक्रम! तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा अनाथ बालकांसह आजी-आजोबांसोबत आनंदोत्सव यावल तालुका प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकां...
वाढदिवसाचा अनोखा उपक्रम! तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा अनाथ बालकांसह आजी-आजोबांसोबत आनंदोत्सव
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
वाढदिवस म्हटला की हार-तुरे, सत्कार आणि मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपला वाढदिवस अनाथ बालक आणि वृद्धांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला.
दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असताना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी चोपडा तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच प्रभू आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमातील मुलांना केक कापून खाऊ घातला. तसेच केळी, सफरचंद, पेरू, जांभूळ व डाळिंब अशी फळे भेट दिली. वृद्धाश्रमातील १३ आजी-आजोबांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी स्वेटर व कानटोप्यांचे वाटप केले.
वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा सोहळा, हार-गुच्छ अथवा सत्कार स्वीकारण्याऐवजी आपल्या कमाईतील काही वाटा गरजू आणि निराधार व्यक्तींसाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याची भावना त्यांच्या या उपक्रमातून दिसून आली.
यावेळी त्यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला तसेच संपूर्ण संस्थेची पाहणी केली. अमर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चंद्रकांत गुलाबराव पाटील (कोसगावकर) व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संस्थेच्या वतीने शेषराव पाटील सर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती तहसीलदार नाझीरकर यांना दिली. अनाथ मुलांचे संगोपन, निराधार वृद्धांची सेवा तसेच प्रभू आश्रमाच्या माध्यमातून मानसिक स्थिती ठीक नसलेल्या व भरकटलेल्या व्यक्तींना औषधोपचार व योग्य देखभाल करून त्यांची ओळख पटविणे आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था करीत आहे.
विशेष म्हणजे कोणतेही शासकीय अनुदान न घेता संस्था हे सामाजिक कार्य अविरतपणे करीत असल्याबद्दल तहसीलदार नाझीरकर यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. अशा संस्थांचे कार्य खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या अव्वल कारकून वैशाली पाटील उपस्थित होत्या. अमर संस्थेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अनाथ बालके, वृद्ध आणि निराधार व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.


No comments