मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनात वर्ल्ड सामनाचे महत्वपूर्ण योगदान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन...
मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनात
वर्ल्ड सामनाचे महत्वपूर्ण योगदान
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न
सामना दिवाळी विनोदी विशेषांक २०२६ चे प्रकाशन करताना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर, स्वामीराज कुलथे, उद्योजक अतुल चासकर, भुषण टाक, निल कुलथे
मुंबई / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी वर्ल्ड सामना दिवाळी अंक महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर यांनी काढले.
‘गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या सौ. स्नेहलता कुलथे संपादित ‘वर्ल्ड सामना दिवाळी अंक २०२६’ च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन ना. नार्वेकर यांच्या हस्ते मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे, नार्वेकर यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल पाटील, स्वीय सहाय्यक रविंद्र पांचाळ, उद्योजक अतुल चासकर, भूषण टाक, निल कुलथे उपस्थित होते.
ना. नार्वेकर म्हणाले, मराठी भाषेची समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आणि साहित्याची ज्योत अखंड तेवत ठेवणे ही काळाची गरज आहे. ‘वर्ल्ड सामना’ गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने दिवाळी अंकाच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
दिवाळी अंक ही मराठी साहित्यविश्वाची समृद्ध परंपरा असून, या माध्यमातून नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना आपले विचार, लेखन आणि प्रतिभा व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. बदलत्या काळातही दिवाळी अंकांची परंपरा टिकवून ठेवणे आणि वाचकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत ‘वर्ल्ड सामना’ने अखंड प्रकाशन परंपरा जपली आहे.
डिजिटल युगात वाचनसंस्कृतीसमोर अनेक आव्हाने उभी असताना मराठी भाषेतील साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रसाराचे कार्य करणाऱ्या अशा उपक्रमांना समाजाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. ‘वर्ल्ड सामना’चा हा साहित्यिक प्रवास मराठी भाषा आणि संस्कृतीच्या समृद्धीसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुषण टाक यांनी केले तर आभार स्वामीराज कुलथे यांनी मांडले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments