adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर शहरात महर्षी वाल्मिकी जयंतीचा भव्य-दिव्य सोहळा उत्साहात संपन्न भजन, कीर्तन, अभंग, फुगडी अन् लव-कुश यांच्या जिवंत देखाव्याने मिरवणुकीची शोभा वाढवली; पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जनजागृती

  मलकापूर शहरात महर्षी वाल्मिकी जयंतीचा भव्य-दिव्य सोहळा उत्साहात संपन्न  भजन, कीर्तन, अभंग, फुगडी अन् लव-कुश यांच्या जिवंत देखाव्याने मिरवण...

 मलकापूर शहरात महर्षी वाल्मिकी जयंतीचा भव्य-दिव्य सोहळा उत्साहात संपन्न 

भजन, कीर्तन, अभंग, फुगडी अन् लव-कुश यांच्या जिवंत देखाव्याने मिरवणुकीची शोभा वाढवली; पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जनजागृती




मलकापूर प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, मलकापूर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मलकापूर शहरात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य-दिव्य मिरवणूक व विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाचा गजर, भजन-कीर्तन आणि महर्षी वाल्मिकी यांच्या जयघोषाने संपूर्ण मलकापूर शहर दुमदुमून गेले. मिरवणुकीची सुरुवात मलकापूर रेल्वे स्टेशन येथून करण्यात आली यावेळी ह.भ.प. प्रभाकर महाराज भोलवनकर, ह.भ.प. सोपान महाराज कांडेलकर, ह.भ.प. प्रमोद महाराज टाकळी, ह.भ.प. नितीन इंगळे महाराज दुधलगाव आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कांडेलकर यांनी आपल्या सुरेल भजन, गवळणी, अभंग व कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.दिंडी सोहळ्यामध्ये शिरसोडी,कुंड,वाघोळा, खेर्डा व निमखेड येथून आलेल्या विविध टाळकरी मंडळी,बालगोपाल व महिला भगिनींनी पारंपरिक पावली सादर करून मिरवणुकीत विशेष रंगत आणली.महिलांची फुगडी, मुलांची फुगडी आणि मुलींची फुगडी यांसह विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रभू श्रीरामाचे पुत्र लव-कुश यांच्या जिवंत देखाव्याने रथाच्या सौंदर्यात आणखी भर घातली. संपूर्ण मिरवणुकीत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या जयंती उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देण्यात आली. दुष्काळी परिस्थिती तसेच भीमाशंकर परिसरात सुरू असलेल्या जंगलतोडीचा निषेध नोंदवून 'झाडे लावा, झाडे जगवा' हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानिमित्ताने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. श्रीकृष्णा लोणे (खेर्डा) यांनी काढलेल्या सुंदर व आकर्षक रांगोळ्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.

मलकापूर शहरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी बंडूभाऊ चवरे यांनी पिण्याच्या पाण्याचे वाटप करून सहकार्य केले.

सकाळपासून सुरू असलेल्या या भव्य मिरवणुकीची रात्री ९.४५ वाजता जनता कॉलेजच्या क्रीडांगणावर महर्षी वाल्मिकी यांच्या महाआरतीने सांगता करण्यात आली. शेवटी उत्सव समितीच्या वतीने आभार प्रदर्शनात श्री राजेश सुरळकर सर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.या उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा दोडे,उपाध्यक्ष संदीप जाधव,सचिव भिकाभाऊ कठोरकर, सहसचिव अरविंद भोलवणकर, कार्याध्यक्ष स्वप्निल धाडे तसेच समितीचे पदाधिकारी,सदस्य, जमात बांधव यांनी उत्सवाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. बाहेरून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच मलकापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक, लहान-थोर मंडळी आणि सर्व सहकार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले.मिरवणुकीच्या सांगतेसाठी जनता कला महाविद्यालयाचे प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकशिक्षण सेवा समितीच्या कार्यकारी मंडळाचे, विशेषतः डॉ. अरविंद कोलते यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच संपूर्ण मिरवणुकीदरम्यान सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचेही आभार व्यक्त करण्यात आले.अशा प्रकारे धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा, सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा महर्षी वाल्मिकी जयंतीचा भव्य सोहळा मलकापूर शहरात अत्यंत आनंददायी, भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments