नागरिक त्रस्त, चोपडा नगरपालिका प्रशासन सुस्त? साने गुरुजी नगर भागात ओपन स्पेस मध्ये अनाधिकृत बांधकामाचा धडाका नेशन महाराष्ट्र न्यूज ब्यु...
नागरिक त्रस्त,चोपडा नगरपालिका प्रशासन सुस्त?
साने गुरुजी नगर भागात ओपन स्पेस मध्ये अनाधिकृत बांधकामाचा धडाका
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा - शहरातील साने गुरुजी नगर भागात असलेल्या नगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेस (खुल्या जागेत) लगतच्या काही रहिवास्यांनी अनाधिकृत अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण हटवून ओपन स्पेस मध्ये सजावटीकरण, वृक्ष लागवड इत्यादी होणे करिता कॉलनीच्या उर्वरित रहिवाशांनी सुमारे सहा ते सात महिन्यांपासून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे.
अर्जाचा रहिवाशांकडून सतत पाठपुरावा केला जात असून सुद्धा अतिक्रमण हटविण्याकरिता नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तसेच अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या रहिवास्यांना आळा घालण्याकरिता उर्वरित रहिवासांच्या वतीने न्यायालयाच्या मार्फत नगरपालिका प्रशासन कार्यवाहीत वेग आणण्याकरिता नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे, तरी सदर कार्यवाही होत नसल्याचे लक्षात घेता काही रहिवाशांनी ओपन स्पेस मध्ये अनाधिकृत अतिक्रमित बांधकाम करण्याचे सत्र सुरू ठेवलेले आहे. नगरपालिकेचे नियमित कर दाते असलेले सुजाण रहिवासी नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. सदर भागातील बहुसंख्य रहिवासी या समस्याने त्रस्त असून नगरपालिकेच्या मंद कार्यवाही बाबत साने गुरुजी नगर भागातून निषेध व्यक्त केला जात आहे. सदर कार्यवाहीला वेग प्राप्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग पुकारण्यात येईल असे नागरिकांना सुचविले.प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


No comments