धनाजी नाना महाविद्यालयात शिक्षक दिवस उत्साहात साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक: हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलि...
धनाजी नाना महाविद्यालयात शिक्षक दिवस उत्साहात साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक: हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात तृतीय वर्ष कला वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे हे होते तर व्यासपिठावर पूज्य विष्णू प्रसाद शास्त्री, उपप्राचार्य डॉ एस व्ही जाधव, उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील यांच्यासहित प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम महानुभाव संप्रदायाचे संस्थापक थोर संत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांना द वर्ल्डस बेस्ट टीचर अशा स्मृती चिन्हाणे सन्मानित करण्यात आले. यावेळी माधुरी भरणे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, महाविद्यालयातील प्राध्यापकांमुळे मनातील अनामिक भीतीचा समूळ नाश होऊन आत्मविश्वास व कौशल्य विकास झाला व आयुष्याला सकारात्मक दिशा मिळाली. याप्रसंगी सत्कारमूर्ती प्राध्यापकांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगतात डॉ एस व्ही जाधव, डॉ सीमा बारी, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी मनोगते व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाचे आयोजन अत्यंत स्तुत्य व आनंददायी असून यामुळे प्राध्यापकांची जबाबदारी अधिक वाढली असून समाजाला निकोप, सकारात्मक व विकसित करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची भूमिका अतिमहत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले.
पूज्य विष्णुप्रसाद शास्त्री यांनी महाविद्यालयात शिक्षक दिनाचा उत्सव साजरा होत असल्याचा मनस्वी आनंद होत असून विद्यार्थ्यांच्या मनात प्राध्यापकांविषयी असलेले प्रेम, आदर, स्नेह बघून महाविद्यालयातील अध्ययन, अध्यापन, संशोधनासाठी पोषक वातावरण असल्याचे मत व्यक्त करीत विद्यार्थी भविष्यकालीन देशाचे व समाजाचे आधारस्तंभ असून स्वतःचे आयुष्य निकोप, निर्व्यसनी व सदचरित्र संपन्न असावे व यासोबत समाज उत्थानासाठी व देशाच्या विकासासाठी सहयोग द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांनी स्तुत्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत वेळेचा सदुपयोग, अचूक मार्गदर्शन व प्रचंड मेहनतीच्या बळावर आपापल्या जीवनात यशसिद्धी करावी हीच शिक्षकांना साठी सर्वात मोठी भेटवस्तू असेल असे मत व्यक्त करीत भविष्य वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचलन छाया शिरसाळे या विद्यार्थ्यांनीने केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

No comments