मतदार जागृतीसाठी महानगरपालिकेच्या पुढाकारातून बाईक रॅली;आयुक्त यशवंत डांगे ई बाईक घेऊन रॅलीत सहभागी शहरातील तृतीयपंथीयांनीही केला १०० टक्क...
मतदार जागृतीसाठी महानगरपालिकेच्या पुढाकारातून बाईक रॅली;आयुक्त यशवंत डांगे ई बाईक घेऊन रॅलीत सहभागी
शहरातील तृतीयपंथीयांनीही केला १०० टक्के मतदानाचा संकल्प
सचिन मोकळं अहिल्यानगर :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
विधानसभा निवडणुकीत शहरात मतदानाचा टक्का वाढावा, जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी नागरीक, मतदारांमध्ये जागृती करत आहोत. त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर शहरातून बाईक रॅली काढून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच, महानगरपालिकेच्या या जनजागृती अभियानात विविध संघटनांसह तृतीयपंथी संघटनाही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली असून, त्यांनीही शंभर टक्के मतदानाचा संकल्प केला असल्याची माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.मतदार जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत नगर शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. यात आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः ई बाईक घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - माळीवाडा वेस - पंचपीर चावडी - आशा टॉकीज - माणिक चौक - भिंगारवाला चौक - कापड बाजार - तेलीखुंट चौक - नेता सुभाष चौक - चौपाटी कारंजा - दिलीगेट - न्यू आर्ट्स कॉलेज ते हुतात्मा स्मारक अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅली नंतर महानगरपालिकेत तृतीयपंथी संघटनेच्या वतीने १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प करण्यात आला.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. नगर शहरात अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याला नागरिक, मतदारांसह विविध संघटनांचीही चांगली साथ मिळत आहे. महानगरपालिकेमार्फत शहरातील विविध घटकातील नागरिक, संघटना, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी आदींमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदानाचा संकल्प करणारी शपथ सर्वांना दिली जात आहे. महानगरपालिकेच्या बस सेवा देणाऱ्या बसेस, बस स्टॉप, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आदींवर फलक लावून, जिंगल्स वाजवून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. मतदारांकडून संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत.महानगरपालिकेतील देयके, विविध पावत्यांवर वॉटरमार्क द्वारे मतदार जागृतीचा लोगो छापण्यात आला आहे. सोशल मीडियात अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून आणत वेगळ्या प्रकारे जनजागृती केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.स्व.पंडित नेहरू यांच्या पुतळ्याला अभिवादन करून घेतली शपथ
मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचा हुतात्मा स्मारक येथे समारोप झाल्यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या वतीने लालटाकी येथे स्व. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी मतदानाची शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा संकल्प केला.


No comments