कौटुंबिक वादातून जावयाचा खून;सासू व नातेवाईकांची जबर मारहाण अहिल्यानगर (दि.४ प्रतिनिधी):- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) श्रीगोंदा तालुक्यात...
कौटुंबिक वादातून जावयाचा खून;सासू व नातेवाईकांची जबर मारहाण
अहिल्यानगर (दि.४ प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे २८ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतले. प्रभाकर अरुण तुपेरे (वय ३४) याला सासरच्या नातेवाईकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान २ जानेवारी २०२५ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला.घटनेच्या दिवशी रात्री ९:३० च्या सुमारास प्रभाकर व त्याची पत्नी रेश्मा यांच्यात जेवण वाढण्यावरून वाद झाला. यावेळी प्रभाकरची सासू छाया लक्ष्मण जाणराव हिने तिचे नातेवाईक देविदास बारकू आडबल्ले यांना फोन करून बोलावले. देविदास त्याची पत्नी नंदा, मुली रेखा बाळू साळवे व साधना संतोष गायकवाड यांच्यासह प्रभाकरच्या घरी पोहोचला.प्रभाकर व रेश्मा यांच्यातील वाद चिघळताच सासरच्या नातेवाईकांनी प्रभाकरला पाठीवर व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे प्रभाकरला पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्याला तातडीने उपचारासाठी बेलवंडीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारांसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले.ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीत प्रभाकरच्या पोटातील आतड्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न केले. उपचारादरम्यान २ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०:०० वाजता प्रभाकरचा मृत्यू झाला.
मृतकाचा भाऊ कुंडलिक अरुण तुपेरे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नी रेश्मा प्रभाकर तुपेरे, सासू छाया जाणराव, देविदास बारकू आडबल्ले, नंदा देविदास आडबल्ले, रेखा बाळू साळवे व साधना संतोष गायकवाड या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कौटुंबिक वादामुळे घडलेल्या या प्रकारामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments