कौशल्याधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्मिती करणे काळाची गरज: रोहिणीताई खडसे - खेवलकर मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हे...
कौशल्याधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्मिती करणे काळाची गरज: रोहिणीताई खडसे - खेवलकर
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीमती जी. जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील इतिहास विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इतिहास अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सयुक्त विद्येमाने दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी द्वितीय वर्ष - कला इतिहास विषयाकरिता एक दिवसीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन माननीय रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून नवराष्ट निर्मितीत अभ्यासक्रमाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावर भारतीय तरुणांना स्पर्धा करावयाची असेल तर त्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य निर्माण होणे आवश्यक आहे.त्याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या इतिहास अभ्यास मंडळाने कौशल्य आधारित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रतिपादित केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव येथील अधिव्याख्याता व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव इतिहास अभ्यास मंडळाच्या सदस्या डॉ. गीता धर्मपाल मॅडम यांनी इतिहास विषयातील रोजगारसंधी आणि त्या संदर्भात प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करण्यासाठी इतिहासाशी संबंधित संस्थांशी अंतर सामंजस्य करणार करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देण्याकरिता आमची संस्था असे करार करण्याकरिता नेहमी कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले.
तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रशांत देशमुख (गरुड महाविद्यालय,शेंदुर्णी) यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार द्वितीय वर्ष कला शाखेतील विषय आराखड्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच द्वितीय वर्ष कला इतिहास या विषया अंतर्गत येणाऱ्या ९ पेपरवर कार्यशाळेत अभ्यासक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तुत कार्यशाळेत इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्राचार्य डॉ. वसंत देसले, प्रोफेसर डॉ. धनंजय चौधरी, प्रा. डॉ. सुनील पाटील, प्रा. डॉ. संजय शिंगाणे,प्रा.डॉ. डी.आर.महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. प्रस्तुत कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य प्रो.डॉ. एच. ए.महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यशाळेचे निमंत्रक इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. पंकजकुमार प्रेमसागर यांनी केले तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. पी.पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments