वाचनामध्ये दुःखाचा कडेलोट करण्याची ताकद- प्रा. लक्ष्मण महाडिक चोपडा येथे मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ...
वाचनामध्ये दुःखाचा कडेलोट करण्याची ताकद- प्रा. लक्ष्मण महाडिक
चोपडा येथे मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - पुस्तकामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. पुस्तक वाचनाने मेंदूप्रमाणेच जगण्यात सुद्धा परिवर्तने घडवतात. वाचनामध्ये दुःखाचा कडेलोट करण्याची ताकद आहे. वाचनाने चरित्रे घडवता येतात, असे मत व्यक्त करत आनंदी जगण्याचा मार्ग पिंपळगाव (बसवंत) येथील सेवानिवृत्त प्राचार्य कवी लक्ष्मण महाडिक चोपडेकर श्रोत्यांना सांगितला.
चोपडा येथील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे आयोजित प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते 'सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत' या विषयावर बोलत होते.
यावेळी मंचावर मसाप शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रायोजक डॉ. विकास हरताळकर, घनश्याम अग्रवाल, शोभाताई शिंपी, भूपेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना ते म्हणाले, भारतीय संस्कृतीत जन्मापासून मृत्यूपर्यंत गाणं कायम आपल्या सोबत आहे. म्हणून आपल्याला जीवनाचं गाणं करता आले पाहिजे; रडगाण करणं मान्य नाही. ज्यांना जीवनाचं गाणं करता येतं त्यांचं नाणं खणखणीत असतं. दुसऱ्याशी तुलना करण्याने दुःख वाट्याला येते. आनंदाच्या जागा न कळल्याने दुःख आपल्याला बरोबर हेरते. जीवन एक शोधयात्रा आहे. जीवनात संघर्ष, चिंता, कष्ट जसे आहेत तसेच सुखही आहे. पण समाधानाची पातळी कळत नसल्याने फसगत होते आणि मग हसण्यापेक्षा रडणंच वाट्याला अधिक येते.
दुःख हे आपल्या आसपास नसून आपल्यातच दडले आहे. अपेक्षा हे दुःखाचे उगमस्थान आहे. गरजेपेक्षा वस्तू साठवल्याने दुःखाचं गाठोड मोठमोठे होत जाते. दु:खाला बाजारपेठ नसते म्हणून दुःख कुरवाळू नये. दुःखाला लात मारुन त्यावर मात करता आली पाहिजे. अपेक्षा भंगातून दुखाचा जन्म होतो.
आपल्याला माणूस म्हणून जगता आणि वागता येणे आनंदी जीवनासाठी गरजेचे आहे. आपल्या वाढत्या वयाबरोबर इंद्रियानी दिलेल्या सूचना नीट न ऐकल्याने वाट्याला दुःख येते. स्वतःला कुठल्याही चौकटीत चौकटीत अडकवून ठेवल्याने जगण्याचा आनंद गमावला जातो. यावेळी जगण्यात आनंद शोधत कार्य करणाऱ्या यशस्वी जीवन जगणाऱ्या अनेकांच्या कथा, रूपक कथा व स्वरचित कवितांच्या ओळी सादर करत आपला विषय त्यांनी फुलवत नेला. प्रास्ताविक कार्यवाह संजय बारी यांनी तर वक्त्यांचा परिचय सुनील पाटील यांनी तर सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी व आभार प्रदर्शन संजय सोनवणे यांनी केले. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होती. महिला श्रोत्यांची संख्या लक्षणीय होती.


No comments