रमजान विशेष राष्ट्रीय एकात्मता आणि इस्लाम धर्माविषयी आस्था न राखणाऱ्या काही धर्म विरोधक तत्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केल...
रमजान विशेष
राष्ट्रीय एकात्मता आणि इस्लाम
धर्माविषयी आस्था न राखणाऱ्या काही धर्म विरोधक तत्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की,धर्म हा राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे. विशेषतः इस्लाम धर्म !वास्तविक या अपप्रचारामध्ये सत्याचा लवलेशही नाही. इस्लाम देशावर प्रेम करण्याचा, इतर धर्मांचा आदर सन्मान करण्याचा आणि इतर कोणत्याही धर्माच्या आराध्यदेवतांचा आणि धार्मिक महापुरुषांचा आदर राखण्याचा आदेश देतो. आमचे सर्व धर्म मानवी जीवनाच्या सामान्य आणि नैतिक मूल्यांबाबत सहमत आहेत. उदाहरणार्थ, सर्वच धर्म सत्य,न्याय, वचनपालन आणि विश्वस्ततेला भले जाणतात. आणि असत्य, अन्याय, अत्याचार, वचनभंग आणि धोकेबाजीला दुराचार समजतात. सहानुभुती, दया, क्षमा, सहृदयता इ. गुणांचा सर्वच धर्म आदर करतात.आणि स्वार्थलोलुपता , पाषाणहृदयता आणि संकुचित मनोवृत्तीला तुच्छ लेखतात. तव्दतच सारे धर्म चांगल्या सामाजिक जीवनाच्या निर्मिती करीता नियमबध्दता, अनुसाशन, सहयोग, स्नेहप्रेम, शुभचिंतन
आणि अन्याय अत्याचार, अव्यवस्था आणि सामाजिक न्यायाला घातक ठरवितात. चोरी, व्यभिचार, हत्या, दरोडा , लाचखोरी आणि अपहार वगैरे सर्वांच्या नजरेत घोर अपराध आहेत.जेथ पावेतो इस्लाम धर्माचा संबंध आहे, तो राष्ट्रीय सौजन्य आणि राष्ट्रीय एकात्मता संबंधीच्या गोष्टींचे समर्थन करतो.
इस्लामी दृष्टीकोनाने सर्वधर्म समानरित्या आदर सन्मानास प्राप्त आहेत. प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य ठरते की, त्याने इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांचा, थोर व्यक्तींचा,ग्रथांचा आदर राखावा. एखाद्या भूकेल्यास क्षती पोहचविणे, एखाद्या धार्मिक विभूतीला बरे-वाईट म्हणणे, एखाद्या धर्मग्रंथाचा अवमान करणे इस्लामच्या दृष्टीने घोर पातक आहे. असे घृणित आणि
व्यर्ज काम जर कोणी मुस्लीम करत असेल किंवा एखाद्या मुस्लिमाने कधीकाळी केले असेल तर अगदी चुकीचे आहे. हे कृत्य इस्लामी सिध्दांताच्या अगदी विरुध्द आहे. इस्लाम प्रत्येक माणसाला एकाच ईश्वराची संतान समजतो. समस्त मानवांना बांधव या नात्याने समान लेखतो. ही गोष्ट केवळ मुस्लिमांपुरती मर्यादित नाही. तर प्रत्येक धर्म, प्रत्येक समूह, प्रत्येक देश आणि प्रत्येक श्रेणीचा मानव दुसऱ्या मानवाचा बांधव आणि त्याच्या समान आहे. मानव या नात्याने सर्वांचे प्राण, सर्वांची संपत्ती, सर्वांची अब्रु, सर्वांचा पंथ,सर्वांचा धर्म समानरित्या आदरणीय आहे. इस्लाम प्रत्येक अत्याचाऱ्यास अत्याचारीच समजतो. मग तो कोणातच्याही विरुध्द असो किंवा कोणत्याही भावनेने केलेले असो.
संकलन :- अब्दुल सरदार पटेल , चोपडा
मो.८७६६७४७०९२
No comments