मलकापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यात खरीप २०२३ चा मंजूर पिक विमा तात्काळ जमा करण्यात यावा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय...
मलकापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यात खरीप २०२३ चा मंजूर पिक विमा तात्काळ जमा करण्यात यावा
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढीत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यात खरीप २०२३ चा मंजूर पिक विमा तात्काळ जमा करण्यात यावा यासह शेतकर्यांच्या विविध समस्यांकडे शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज २२ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढीत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सन २०२३ मध्ये तालुक्यातील शेतकर्यांनी ऑनलाईन पध्दतीने शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला होता. तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह अतिवृष्टी व पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांची नासाडी व शेती खरडून गेली होती. त्यानंतर ही बाब शासन, प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले होते. तर शेतकर्यांना पिकविमा मंजूर करण्यात आला होता, मात्र बर्याच शेतकर्यांना २०२३ चा पिकविमा अद्यापही मिळालेला नाही. याबाबत अनेकदा कृषी विभागाकडे मागणी करण्यात आली मात्र वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. तर याप्रकरणी विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान राज्याचे कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना ३१ मार्च २०२५ पुर्वी सरसकट पीक विमा देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता एप्रिल महिना संपत आला असतांनाही शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे कृषीमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे.
तर नुकतेच ११ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात लोक प्रतिनिधींच्या घरासमोर शेतकर्यांच्या न्याय मागण्यांसाठी मशाल आंदोलन करण्यात येवून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
एकीकडे शेतकर्यांना आशा दाखविली जाते तर दुसरीकडे त्यांच्या नुकसानीचा लाभ त्यांना देण्यात येत नसल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी बैलगाड्यांसह शेतकर्यांना सोबत घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत कृषी अधिकार्यांना धारेवर धरीत आम्हाला तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांनी व शेतकर्यांनी कृषी कार्यालयात चांगलाच गदारोळ घालीत जोपर्यंत आम्हाला आमच्या नुकसानीचे व पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा इशारा देत त्याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर नरमलेल्या तालुका कृषी अधिकार्यांनी शेतकर्यांचा मंजूर पीक विमा येत्या ७ दिवसाच्या आत त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असे आश्वासन दिल्याने तुर्त ठिय्या आंदोलन थांबवित शेतकर्यांनी कार्यालय सोडले.
सदर आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, तालुका युवा प्रमुख अमोल बावस्कार, शहर उपप्रमुख बलराम बावस्कार यांचेसह शेतकरी ललित डवले, अनिलसिंह गहेलोत, रामभाऊ म्हैसागर, निलकंठ मोडक, अभिषेक शिंदे, नितीन शिंदे, शंतनु गुलगे, श्रीकृष्ण क्षिरसागर, गजानन क्षिरसागर, साहेबराव क्षिरसागर, रमेश क्षिरसागर, गजेंद्र नारखेडे, संजय बाठे, गजानन ठोसर, ज्ञानेश्वर वडोदे, कृष्णा पाटील, गणेश बाठे, भागवत अढाव, रमेश रायपुरे , अर्जुन पाटील यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments