नगर पालिका कार्यालयात मुख्याधिका-यांच्या नावाने घागर पुजून श्राध्द घालणार प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांचा निवेदनाद्वारे ...
नगर पालिका कार्यालयात मुख्याधिका-यांच्या नावाने घागर पुजून श्राध्द घालणार
प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांचा निवेदनाद्वारे इशारा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- अवैध बांधकाम केलेल्या आरोग्यम् हॉस्पीटल बिल्डींगवर ३० एप्रिल २०२५ (अक्षय्य तृतीया) पर्यंत कारवाई करा अन्यथा न.प. कार्यालयात मुख्याधिकार्यांच्या नावाने घागर पुजून श्राध्द घालण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी १६ एप्रिल रोजी न.प. प्रशासक तथा तहसीलदार, न.प. मुख्याधिकारी मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर न.प. हद्दीमध्ये चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित शांती आरोग्यम् हॉस्पीलची बिल्डींग ही न.प.ची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आली असतांनाही न.प. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे सदर बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करीत आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी सदरचे अवैध बांधकामा बाबत संबंधितास पत्र देवून तीन ते चार महिने उलटले असतांनाही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे एकप्रकारे त्या अवैध बांधकामधारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करण्यात येत आहे.
याबाबत दि.२७.१२.२०२४ रोजी रितसर लेखी तक्रार न.प.मुख्याधिकारी यांचेसह मंत्रालयापर्यंत दाखल केल्या होत्या. या तक्रारीवरून न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी संबंधित बांधकाम धारकास सदरचे बांधकाम एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा आपणा विरूध्द फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र (नोटीस) दि.२७.१२.२०२४ रोजीच डॉ.विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) मलकापूर यांना दिले होते. या पत्राला चार महिन्याच्या कालावधी उलटत आहे. मात्र तरीही सदरचे बांधकाम हे जैसे थे असेच आहे. तर सदर प्रकरणी न.प.प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने मी ३१.०१.२०२५ रोजी न्याय मागणीसाठी न.प.कार्यालयात गोट्या खेळा आंदोलन त्यानंतर अर्धनग्न आंदोलन, तर मागील महिन्यात प्रभारी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्या वाहनाला काळे फासून न.प. च्या सुस्त कारभाराचा निषेध नोंदविला. तरीसुध्दा न.प. प्रशासन या प्रकरणी गंभीर झालेले दिसत नाही.
एकीकडे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.शेळके संबंधित बांधकाम धारकास एक महिन्याचा कालावधी देतात तर दुसरीकडे सदरचे बांधकामावर न.प. प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे त्या अवैध बांधकाम धारकास वाचविण्याचा व पाठीशी घालण्याचाच सुरू आहे. तेव्हा या प्रकरणी येत्या ३० एप्रिल २०२५ (अक्षय्य तृतीया) पुर्वी योग्य ती कार्यवाही न झाल्यास ३० एप्रिलला न.प. कार्यालया समोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्याधिकार्यांच्या नावाने घागर पुजून श्राध्द घालण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.

No comments