मनवेलमध्ये मिरवणुकीत राडा! दोन गटात हाणामारी, १६ जणांवर गुन्हा दाखल भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल तालुक्...
मनवेलमध्ये मिरवणुकीत राडा! दोन गटात हाणामारी, १६ जणांवर गुन्हा दाखल
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील मनवेल गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत दोन गटात झालेल्या वादानंतर हाणामारीची घटना घडली. सोमवारी १४ एप्रिल रात्री साडेआठ वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी यावल पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधात एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनवेल गावात १४ एप्रिल रोजी सायंकाळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ८ वाजता ही मिरवणूक गावातील दादाजी धुनीवाले मंदिर आणि विठ्ठल मंदिराजवळ आली असता, दोन गटांमध्ये वाद झाला.
पहिल्या गटातील फिर्यादी सुनीता विकास अडकमोल (वय ४०, रा. मनवेल) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मिरवणुकीत समाजबांधव नृत्य करत असताना काही व्यक्तींनी महिलांच्या अंगावर नाणे स्वरूपात पैसे फेकले. याचा जाब विचारल्याने वाद झाला आणि मिरवणुकीतील महिला व पुरुषांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी नाना रमण पाटील, कुणाल श्याम पाटील, यज्ञेश पंडित पाटील, हर्षल रणछोड पाटील, भरत कोळी आणि शंकर देविदास पाटील (सर्व रा.मनवेल, ता. यावल) यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या गटातील फिर्यादी पन्नालाल हुकुमचंद पाटील (वय ४२, रा.मनवेल) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीची वाद्याची गाडी जवळच्या महादेव मंदिराच्या भिंतीच्या कोपऱ्याला लागल्याने झालेल्या नुकसानीबद्दल विचारले असता वाद झाला. या कारणावरून नयन विनोद अडकमोल, आदेश विलास इंधाटे, विलास सुभान इंधाटे, सुभाष राजधर भालेराव, प्रथमेश सोनवणे, भूषण संजय भालेराव, सागर संतोष इंधाटे, योगेश भगवान इंधाटे, मनोज सुभाष भालेराव आणि गोकुळ समाधान इंधाटे (सर्व रा. मानवेल) यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन आणि खिशातील पाच हजार रुपये रोखड कोणीतरी काढून घेतली आणि लोखंडी पाइपने पायाला मारून दुखापत केली. याप्रकरणी पन्नालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील दहा जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करत आहेत. एकाच मिरवणुकीत दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
No comments