adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रॉपर्टीच्या वादातून ‘त्या’ तरुणाची हत्या ? निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग ?

  प्रॉपर्टीच्या वादातून ‘त्या’ तरुणाची हत्या ? निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग ? भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी   (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ...

 प्रॉपर्टीच्या वादातून ‘त्या’ तरुणाची हत्या ?

निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग ?


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील मोहराळा गावातून बेपत्ता झालेल्या आणि पाच दिवसांनंतर विहिरीत मृतदेह आढळलेल्या १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले असून, प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रविवारी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिघांना ताब्यात घेतले आहे.

गांजा पाजून विहिरीत ढकलल्याची कबुली

मोहराळा, तालुका यावल येथील १९ वर्षीय साहिल शब्बीर तडवी हा तरुण १६ जूनपासून बेपत्ता होता. सर्वत्र शोध घेऊनही तो न मिळाल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान, २० जून रोजी त्याचा मृतदेह मोहराळा गावाकडून वड्री गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेवा मधुकर चौधरी यांच्या शेत विहिरीत मिळून आला. मृतदेह मिळाल्यानंतर साहिलच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गावातील निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या घरावर हल्ला चढवला आणि त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पथकासह गावात दाखल झाले आणि त्यांनी गावात शांतता प्रस्थापित करून चोख बंदोबस्त लावला. मृतदेह बाहेर काढून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

चौकशीतून गुन्हेगारांचा पर्दाफाश

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गावातील दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी बोलावले. सखोल चौकशीअंती त्या मुलांनी धक्कादायक कबुली दिली. त्यांनी सांगितले की, निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या सांगण्यावरून त्यांनी साहिल तडवीला अमली पदार्थ गांजाचे सेवन करायला लावले आणि नंतर त्याला विहिरीत ढकलून दिले. तसेच, त्याचा मोबाईल दुसऱ्या एका विहिरीत टाकून दिल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यानंतर ते घाबरले होते, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

निलंबित पोलिसासह तिघांवर खुनाचा गुन्हा

पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात समीर गफूर तडवी यांच्या फिर्यादीवरून निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब तडवी आणि दोन अल्पवयीन यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि पोलीस कर्मचारी वासुदेव मराठे करत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.

No comments