स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करण्याची गरज :- दीपक सावळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करण्याची गरज :- दीपक सावळे
भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मतदारांमध्ये जनजागृती करून गावपातळीवर एकजुटीचा संदेश देणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत दीपक सावळे यांनी व्यक्त केले. ते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन करत होते. त्यांनी सांगितले की, ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, अंगणवाड्या, महिला बचतगटांना पाठबळ, समाजमंदिरे अशा विविध विकास योजनांना गती देण्यात आली आहे.
त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्ध, विधवा, अपंग आणि निराधार लाभार्थ्यांचे मानधन वेळेवर सुरू करण्यात आले आहे. वैयक्तिक वैद्यकीय मदत, रेशन कार्ड, शैक्षणिक दाखले, अपघातग्रस्तांसाठी मदतनिधी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांची माहिती आणि अंमलबजावणी, शेत रस्ते – या सर्व सेवा गावागावात कार्यकर्त्यांनी पोहोचवल्या आहेत.
आता वेळ आहे, या कामांचा प्रचार-प्रसार करून जनतेला मतदानासाठी प्रेरित करण्याची. मतदारांना पैसा, मद्यपार्टी यांसारख्या गोष्टींपेक्षा कामे, प्रामाणिकपणा आणि जनहिताचे राजकारण हेच निकष महत्त्वाचे वाटले पाहिजे, असे सावळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, “एक खरा कार्यकर्ता तोच जो त्याग करतो, शिस्त पाळतो आणि लोकांच्या प्रश्नांशी एकरूप होतो. त्यागाशिवाय कार्यकर्ता घडत नाही. कार्यकर्ता हा सुरुवातीला शून्य असतो, पण नेत्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून आणि ऊर्जा घेऊन तो घडत असतो.”
“संघटन टिकवायचं असेल तर कार्यकर्त्यांनी नेतृत्वगुण आत्मसात केले पाहिजेत. एक कार्यकर्ता असा असावा की त्याचं व्यक्तिमत्व इतर दहा कार्यकर्त्यांनी अनुकरण करण्यासारखं असावं. असे कार्यकर्तेच पक्षाच्या मुळावर उभे राहतात आणि दीर्घकाळ संघटन टिकवतात.” शेवटी दीपक सावळे यांनी आवाहन केले की, "पक्षाच्या यशासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. गावागावातील कार्यकर्त्यांनी समन्वय साधून, मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करून निवडणूक यशस्वी करण्यासाठी तत्पर राहावे."
No comments