गुरुपौर्णिमेचे अनोखे दान: न्यायालयाचा न्याय, पोलिसांची साथ - धुळ्यात नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू! धुळे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...
गुरुपौर्णिमेचे अनोखे दान: न्यायालयाचा न्याय, पोलिसांची साथ - धुळ्यात नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
धुळे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे : गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधत धुळे जिल्हा न्यायालयाने आणि पोलीस दलाने एक स्तुत्य उपक्रम राबवत नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला.१०जुलै रोजी सकाळी १० वाजता धुळे पोलीस मुख्यालयाच्या हॉलमध्ये आयोजित मुद्देमाल वितरण सोहळा - २०२५ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.व तसेच या कार्यक्रमात तब्बल ४२,०२,६३५/- रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालक आणि गुन्ह्यातील फिर्यादींना परत करण्यात आला.यामध्ये चोरीला गेलेल्या वस्तू,गहाण ठेवलेले दागिने आणि इतर मालमत्ता परत मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर काहींना भावना अनावर झाल्या.
या हृदयस्पर्शी सोहळ्याच्या धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश,न्या.माधुरी आनंद,या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या व तसेच न्या.माधुरी आनंद यांनी धुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.अश्या प्रकारच्या "या उपक्रमामुळे लोकांचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे," असे त्या म्हणाल्या.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, दत्तात्रय कराळे,पोलीस अधीक्षक,श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या कार्यालयातील मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत करण्याचे निर्देश दिले होते.
या यशस्वी उपक्रमात पोलीस उप अधीक्षक श्री. विश्वजित जाधव, राजकुमार उपासे, संजय बाबळे, तसेच परिमंडळ पोलीस उप अधीक्षक श्री. सागर देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार (स्थानिक गुन्हे शाखा) आणि राखीव पोलीस निरीक्षक श्री. मुकेश माहुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, मुद्देमाल कारकून, अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेतले.
यावेळी मुद्देमाल प्राप्त करणाऱ्या लाभार्थी पुरुष आणि महिलांनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त करत धुळे पोलीस आणि न्यायालयीन व्यवस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. हरवलेली किंवा चोरीला गेलेली आपली मालमत्ता परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या कार्यक्रमाला वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक व प्रतिनिधी,पोलीस अधिकारी,कारकून, तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रतिनिधी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम केवळ हरवलेला मुद्देमाल परत करणे नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणारा ठरला. भविष्यातही नागरिकांनी विश्वासाने पुढे येऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
No comments