११ ते १८ जुलै दरम्यान जागतिक लोकसंख्या सप्ताहाचे आयोजन जिमाका वृत्तसेवा/ अहिल्यानगर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दरवर्षी ११ जुलै हा जागति...
११ ते १८ जुलै दरम्यान जागतिक लोकसंख्या सप्ताहाचे आयोजन
जिमाका वृत्तसेवा/ अहिल्यानगर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दरवर्षी ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त ११ ते १८ जुलै २०२५ दरम्यान जागतिक लोकसंख्या सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
कुटुंब नियोजन पद्धतींचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा वापर करून हा दिन साजरा केला जातो. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश फक्त अनिच्छित गर्भधारणा टाळणे एवढाच नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे. कुटुंब नियोजन सेवांविषयी अज्ञानामुळे अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू होतात. या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत लाभार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात.
त्यामध्ये प्रामुख्याने स्त्री व पुरुष शस्त्रक्रिया, गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, निरोध यांसह नवीन पद्धती जसे की गर्भनिरोधक तिमाही इंजेक्शन व आठवड्याला एक गोळी यांचा समावेश आहे.
नियोजित पालकत्वासाठी आरोग्यदायी वेळ आणि गर्भधारणेमधील अंतर या विषयाशी सुसंगत ठरावे म्हणून यावर्षीचे घोषवाक्य आहे.
“आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा.”
यानिमित्त आरोग्य विभागाने दिलेल्या कुटुंब नियोजन पद्धतींचा वापर करून पाळणा लांबवणे, कुटुंबातील सदस्यसंख्या मर्यादित ठेवणे, लोकसंख्या नियंत्रण व माता-बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments