दहिगाव ग्रामस्थांची गटारी बांधकामासाठी पंचायत समितीकडे मागणी; १७ वर्षांपासून सुरु आहे पाठपुरावा भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत ग...
दहिगाव ग्रामस्थांची गटारी बांधकामासाठी पंचायत समितीकडे मागणी; १७ वर्षांपासून सुरु आहे पाठपुरावा
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दहिगाव (ता. यावल) येथील गौसीया नगर, सावखेडा रस्ता, वार्ड क्र. १ मधील नागरिकांनी गावातील गटारीच्या अत्यंत निकड असलेल्या समस्येकडे लक्ष वेधून पंचायत समिती कार्यालयाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, यावल यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सद्यस्थितीत गावात पावसाचे पाणी व घरगुती सांडपाणी साचून राहते. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया व इतर रोगांचा धोका वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामसेवकांनी यापूर्वी गटारी बांधून देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून काही ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतः खोदकामही केले. मात्र, आता ग्रामसेवक गटारी बांधकामाचे काम पुढे ढकलत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
विशेष म्हणजे, शब्बीर पिंजारी, शकिल पिंजारी, मुक्तार पिंजारी, इरशाद पिंजारी, फातेमा पिंजारी, हनिफा पिंजारी, यास्मीन पिंजारी, जयनुर पिंजारी, भिकन पिंजारी आदींनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, गेल्या १७ वर्षांपासून गटारीच्या समस्येसंदर्भात सातत्याने अर्ज दिले जात आहेत. ग्रामविकास अधिकारी यशवंत चौधरी यांना ५ ते ६ वेळा अर्ज देऊन देखील अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही तरी दहिगाव येथे गटारीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकांचे आश्वासन लेखी स्वरूपात घेतले जावे. आरोग्याच्या दृष्टीने वेळ न दवडता उपाययोजना कराव्यात. यासोबतच त्यांनी इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही, तर ग्रामस्थांना पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मार्ग पत्करावा लागेल. ग्रामस्थांच्या दीर्घकाळाच्या या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
No comments