कॅन्सरविषयी जागरूकता आणि मानसिक बळ अत्यावश्यक - लेखिका : ऐश्वर्या भोसले छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्...
कॅन्सरविषयी जागरूकता आणि मानसिक बळ अत्यावश्यक - लेखिका : ऐश्वर्या भोसले
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात प्रेरणादायी संदेश
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“कॅन्सर हा फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक लढाही असतो. त्यामुळे त्याविषयी सर्वांनी सावध राहून वेळेपूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये तो कळतच नाही, फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर श्वासाचे त्रास सुरू होतात, तोंडाच्या कॅन्सरमध्ये मानसिक नैराश्य अधिक ठरते. म्हणून कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली की तात्काळ तपासणी करावी. स्वीकार आणि मनोबळ यामुळेच मी आज या टप्प्यावर आहे,”असे प्रतिपादन लेखिका ऐश्वर्या तानाजी भोसले यांनी सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात झालेल्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात केले. जगणं नव्याने जगताना... कॅन्सर योद्ध्याचा प्रेरणादायी प्रवास’ या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या भोसले यांनी स्वतःच्या अनुभवातून बोलत विद्यार्थ्यांना प्रबोधनपर आणि अंतर्मुख करणारे विचार दिले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. रामराजे मानेदेशमुख, डॉ. आबासाहेब उमाप, डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा. प्रियांका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे आदी प्राध्यापक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मानसिक तणाव ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी संवाद, संगीत, ध्यान यांचा उपयोग करा. स्वभाव एक दिवसात घडत नाही; घर, समाज आणि परिस्थिती यांचा त्यावर प्रभाव असतो. आपण आपल्याच स्वभावाचे विश्लेषण करायला हवे. कॅन्सरच्या काळात मी स्वतःला समजून घेतले. शरीर थकते पण मनाने आपण सक्षम राहिलो पाहिजे.”
स्वतःला कॅन्सर कसा झाला आणि पुस्तक लेखनाचा प्रवास सांगताना त्यांनी सांगितले, “२०२० मध्ये मला सतत ताप येऊ लागला. कोरोना काळ होता. टेस्ट निगेटिव्ह आल्यावर पुढील तपासणीत ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले. मी सर्व उपचार स्वतः समजून घेतले, करून घेतले. त्या अनुभवातून ‘कॅन्सर’ म्हणजे मरण नव्हे, ही जाणीव झाली. इंटरनेटवर प्रसिद्ध लोकांच्या कथा होत्या, पण सामान्य लोकांचे अनुभव कुठेच नव्हते. म्हणून मी नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, वर्धा येथे फिरून कॅन्सरग्रस्त सामान्य लोकांना भेटले. त्यांच्या अनुभवाचे शब्दांकन करून हे पुस्तक लिहिले. कॅन्सर म्हणजे फक्त आजार नव्हे, तो एक फोबिया आहे. आजही अनेक लोक तो लपवून ठेवतात. पण त्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टी अत्यंत आवश्यक आहे.आज पुस्तकाच्या माध्यमातून अनेक भाषांमध्ये हे अनुभव पोचत आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे असेही त्या म्हणाल्या. “प्रास्ताविक प्रा. श्रीकांत भोकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका कुंभार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांनी मानले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments