नदी स्वच्छतेसाठी न्हावी केंद्राचा स्तुत्य उपक्रम: श्री क्षेत्र तापी नदी परिसरात दोन टन निर्माल्य संकलित इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेम...
नदी स्वच्छतेसाठी न्हावी केंद्राचा स्तुत्य उपक्रम: श्री क्षेत्र तापी नदी परिसरात दोन टन निर्माल्य संकलित
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पर्यावरण व अध्यात्माच्या समन्वयातून समाजप्रबोधन करण्याच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित शाखा- न्हावी (ता. यावल, जि. जळगाव) यांच्या वतीने श्री क्षेत्र तापी नदी, भुसावळ येथे भव्य नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानाअंतर्गत तब्बल ६० सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून सुमारे २ टन निर्माल्य कचरा संकलित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे श्री क्षेत्र तापी नदी परिसराची साफसफाई तर झालीच, शिवाय अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेल्या श्री महाकाली व सप्तशृंगी मातेच्या मंदिरातील भग्न मूर्ती व फोटोंचे योग्य पद्धतीने विसर्जन करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
सदर उपक्रमासाठी मागील महिन्यांपासून अष्टमी तिथीचा योग साधून एक वर्षभर स्वच्छता मोहिम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानास परम पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाचा भक्कम आधार लाभला आहे. या सेवाभावी कार्यामुळे निसर्ग, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधला गेला असून, भाविक व नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकतेचा संदेशही पोहोचला आहे. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार सेवा केंद्राने व्यक्त केला आहे.

No comments