६ हजार मुलींचा निर्धार पदवी घेतल्याशिवाय लग्न करणारच नाही..बालविवाहमुक्त जिल्ह्यासाठी जनजागृतीची मोठी लाट.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक ...
६ हजार मुलींचा निर्धार पदवी घेतल्याशिवाय लग्न करणारच नाही..बालविवाहमुक्त जिल्ह्यासाठी जनजागृतीची मोठी लाट..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१३):-मलाला दिनाच्या निमित्ताने,जगभरातील मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणा ठरलेली नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई हिचा जागतिक सन्मान करण्यासाठी, स्नेहालय संस्थेच्या उडान, बालभवन,रेडिओनगर आणि फॅमिली बेस केअर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने,जेऊर ग्रामपंचायत,संतुकनाथ इंग्लिश विद्यालय,आणि उच्च माध्यमिक विद्यालय,जेऊर यांच्या सहकार्याने एक व्यापक आणि हृदयाला भिडणारा शिक्षण जनजागृती अभियान राबविण्यात आला.या अभियानाच्या निमित्ताने स्नेहालय उडान प्रकल्पाने २०२७ पर्यंत 'अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त जिल्हा' बनवण्याचे ध्येय पुन्हा अधोरेखित केले.यासाठी ‘माझं गाव बालविवाहमुक्त गाव’ आणि ‘माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा’ ही दोन प्रमुख अभियानं जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू आहेत.या मोहिमेसाठी स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनीही जिल्ह्यातील शाळा,ग्रामपंचायती आणि तरुण कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे
की, "बालविवाह थांबवा – शिक्षण वाढवा!" या विशेष कार्यक्रमात तब्बल ६,००० पेक्षा अधिक मुलींनी “मी पदवी घेतल्याशिवाय लग्न करणार नाही” असा जाहीर संकल्प केला. ही फक्त घोषणा नव्हती, तर मुलींच्या मनातील शिक्षणासाठीची आग आणि स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी घेतलेली जबाबदारी होती.या जनजागृती अभियानामध्ये विविध रचनात्मक माध्यमांचा वापर करण्यात आला,पदयात्रा, पथनाट्य,व्याख्यानं,सेल्फी पॉइंट्स,माहिती पत्रक वाटप, आणि आठवडे बाजारात जनतेशी थेट संवाद,यांद्वारे २२,००० नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात आले. केवळ जेऊर नव्हे,तर परिसरातील ग्रामीण भाग, झोपडपट्ट्या,आणि शाळांमध्येही या उपक्रमामुळे मुलींमध्ये शिक्षणाविषयी आत्मभान आणि आत्मविश्वास निर्माण झाला.कार्यक्रमात उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी मुलींशी थेट संवाद साधून,त्यांच्यासमोर बालविवाहाचे धोके,नकळत्या वयातील चुकीचे निर्णय,आणि शिक्षण हेच भवितव्य असण्याचा संदेश दिला.स्नेहालयच्या पीआर कार्यकारी अधिकारी संगीता सानप यांनी मुलींना मलालाची संघर्षगाथा सांगितली जिच्यावर गोळी झाडली गेली,पण तिने शिक्षणाचा आवाज थांबू दिला नाही.आज तिच्या Malala Fund मुळे जगभरातील २ कोटींपेक्षा अधिक मुली शाळेत आहेत.या संपूर्ण मोहिमेचा उद्देश केवळ मुलींना शाळेत आणणे नव्हता, तर त्यांना सक्षम, जागरूक आणि स्वतःसाठी ठाम निर्णय घेणाऱ्या नागरिकांमध्ये रूपांतरित करणे होता.
या जनजागृतीमुळे अनेक ठिकाणी ठरलेले बालविवाह थांबवण्यात आले, आणि पालकांनीही आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.
जेऊर येथील बाजाराच्या ठिकाणी स्नेहालय च्या मुलींनी मलाला चा जीवनपट आणि बालविवाह प्रतिबंध यावर पथनाट्य सादरीकरण केले.
या अभियानाचा शेवट सामूहिक शिक्षण प्रतिज्ञा आणि जोरदार घोषणांने झाला.आज स्नेहालय उडान प्रकल्प अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक मनात शिक्षणाचा दीप लावण्याचे कार्य करत आहे.हा मलाला दिन, केवळ एक साजरा करण्याचा दिवस नव्हता तर एक सामाजिक क्रांतीची सुरूवात होती,जी हजारो मुलींच्या मनात शिक्षणासाठी चिरंतन धग पेटवून गेली.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेऊर येथील सरपंच बाबासाहेब तोडमल,संतुकनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवले सर,पर्यवेक्षक आठरे सर व इतर कर्मचारी,स्नेहालय संस्थेचे जयश्री शिंदे,संदीप क्षीरसागर,सागर भिंगारदिवे,स्वप्नील मोकळ,प्रियांका कोंगळे,सीमा जुनी,पूजा दहातोंडे,पूजा डाकुआ व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments