भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमाला २९ जुलैपासून रंगणार यंदाचे अकरावे वर्ष : पुणे, नाशिक, सांगलीच्या वक्त्यांना ऐकण्याची ...
भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमाला २९ जुलैपासून रंगणार
यंदाचे अकरावे वर्ष : पुणे, नाशिक, सांगलीच्या वक्त्यांना ऐकण्याची रसिकांसाठी आंनदपर्वणी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. यंदा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. त्यात २९, ३१ जुलै आणि २ ऑगस्ट असे तीन पुष्प गुंफले जातील. संस्कार, ज्ञानरंजन, जाणिवा अशा तीन विषयांचा त्रिवेणी संगम वक्त्यांच्या व्याख्यानातून भुसावळकर रसिकांना अनुभवता येतील.
प्रथम पुष्प अहिल्यादेवी कन्या विद्यालयात २९ जुलै राेजी दुपारी १२ वाजता पुण्याच्या प्राध्यापिका अश्विनी टाव्हरे या गुंफतील. ‘कळी उमलताना आवश्यक संस्कार’ हा त्यांचा विषय आहे. द्वितीय पुष्प दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ३१ जुलै राेजी सकाळी ९ वाजता नाशिकचे राजेंद्र उगले हे गुंफतील. ‘मुक्काम पाेस्ट आनंदनगर : किस्से, कविता, गाणी, गप्पा’ हा त्यांचा विषय आहे. तृतीय पुष्प कुऱ्हे पानाचे येथील रा. धाें. माध्यमिक विद्यालयात २ ऑगस्ट राेजी सकाळी ९ वाजता सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे गुंफतील. ‘माझी कविता माझं जगणं’ हा त्यांचा विषय आहे. दरवर्षी या व्याख्यानमालेचे तिन्ही पुष्प भुसावळ शहरातील शाळांमध्ये गुंफले जायचे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील वक्त्यांची व्याख्याने ऐकण्यासी संधी मिळावी आणि त्यांना गाेडी लागावी यासाठी गेल्या वर्षापासून एक पुष्प भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे गुंफले जाते. वक्त्यांना थेट शाळेत नेऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिकांशी संवाद घडवून आणायचा असा हा उपक्रम आहे. काेराना काळातही हा उपक्रम खंडीत झाला नव्हता. तेव्हा त्याचे स्वरुप ऑनलाइन हाेते. कथाकथन, कविता, गझल, व्यक्तीमत्व विकास, अध्यात्म असे नानाविध विषय या व्याख्यानमालेतून हाताळले जाताहेत. माय, माती, माणूस अशी या व्याख्यानमालेची मध्यवर्ती संकल्पना आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलककर यांनी सांगितले.
असे आहेत व्याख्यानमालेचे वक्ते....
प्रथम पुष्पाच्या वक्त्या पुण्याच्या प्राध्यापिका अश्विनी टाव्हरे या आहेत. त्या कीर्तनकार, व्याख्याता, संतसाहित्याच्या निष्णात अभ्यासक आहेत. बारामती शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात तीन वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा. संपूर्ण राज्यभरात १५०पेक्षा अधिक राज्यस्तरीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा विजेत्या. प्रबाेधनकार ठाकरे राज्यस्तरीय युवा वक्ता पुरस्काराच्या मानकरी आहेत.
द्वितीय पुष्पाचे वक्ते नाशिकचे राजेंद्र उगले हे आहेत. ते उपक्रमशील शिक्षक, व्याख्याता, कवी, उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत. ‘सुंदर माझे घर’, ‘थांब ना रे ढगाेबा’. ‘काळाच्या कॅमेऱ्यातून’ या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. बालसाहित्यात अधिक रुची. अखिल भारतीय साहित्य संमेलनात काव्य सादरीकरण, वाडमयीन नियतकालिके, दिवाळी अंकांसाठी विपूल लेखन केले आहे.
तृतीय पुष्पाचे वक्ते सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे आहेत. स्टेटअप फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक. लाेकसाहित्य आणि लाेकपरंपरांचे अभ्यासक. उत्कृष्ट कवी, व्याख्याता, सूत्रसंचालक म्हणून ख्याती. साहित्य वर्तुळात ‘दंगलकार’ म्हणून रसिकांना परिचित आहेत. त्यांच्या माय, माती, माणुसकी, चळवळ विषयावरील कविता प्रचंड गाजलेल्या आहेत.
No comments