शासकीय नियमांची पायमल्ली यावलच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल पंच...
शासकीय नियमांची पायमल्ली यावलच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कारभार करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मासिक तक्रार निवारण सभा घेणे बंधनकारक असताना, गटविकास अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही सभा घेतली नाही, असे निदर्शनास आले आहे.
यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांची भेट घेऊन गटविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या ३ मार्च २०२० च्या परिपत्रकानुसार, प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तक्रार निवारण सभा घेणे अनिवार्य आहे. तसेच, या सभेत प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवणेही बंधनकारक आहे. असे असतानाही, यावलच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही तक्रार निवारण सभा घेतली नाही, हे आश्चर्यकारक आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी सभा न घेण्यामागे नेमके काय कारण आहे, त्यांना कोणाचा राजकीय पाठिंबा आहे का, असे प्रश्न ग्रामीण नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत.
आपल्या कर्तव्यात कसूर करून शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून मनमानी कारभार करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांची यावलमधून तात्काळ बदली करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक काँग्रेसचे जुगल पाटील, यावल तालुका अध्यक्ष राजू काटोके, आकाश चोपडे, शिवसेना फैजपूर शहर प्रमुख पिंटू मंदवाडे आणि चेतन संपकाळे यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात हे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचीही भेट घेणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

No comments