निरोड येथील शेतकऱ्यांचा बैल पोळा सणातून सरकारला साद: कर्जमुक्ती आणि मालाला योग्य भाव द्या अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकव...
निरोड येथील शेतकऱ्यांचा बैल पोळा सणातून सरकारला साद: कर्जमुक्ती आणि मालाला योग्य भाव द्या
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
संग्रामपूर/ २२ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा पारंपरिक आणि कृतज्ञतेचा सण असलेला बैल पोळा यंदा तालुक्यातील निरोड गावात अनोख्या पद्धतीने साजरा झाला. दरवर्षी श्रावण अमावस्येला मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सणात शेतकरी आपल्या मेहनतीचा साथीदार असलेल्या बैलांची पूजा करतात आणि त्यांचा सन्मान करतात. यंदा मात्र, निरोड येथील शेतकऱ्यांनी या सणाच्या निमित्ताने आपल्या व्यथा आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला.यावर्षी बैल पोळा सणादरम्यान, निरोड येथील एका युवा शेतकरी शेतकरी रोशन देशमुख यांनी आपल्या बैलाला साध्या पण प्रभावी पद्धतीने सजवले. बैलाच्या पाठीवर त्याने लिहिले, "सरकारने शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या." हा संदेश केवळ रंगांनी लिहिलेला नसून, शेतकऱ्यांच्या अंत:करणातील वेदनेचा आणि आक्रोशाचा आवाज आहे. शेतीतील वाढते यांत्रिकीकरण आणि आर्थिक संकटांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी या सणाच्या माध्यमातून सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या. कर्जमुक्ती आणि योग्य भावाची मागणी निरोड येथील शेतकऱ्यांनी सांगितले, "आम्ही वर्षभर कष्ट करतो, पण आमच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. बैल पोळा हा आमच्या बैलांसोबतच आमच्या मेहनतीचा सण आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की, आम्हाला कर्जमुक्त करा आणि आमच्या पिकांना योग्य भाव द्या, जेणेकरून आम्ही सन्मानाने जगू शकू." गावातील इतर शेतकऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला. बैल पोळा सणादरम्यान गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनेक बैलांवर अशाच प्रकारचे संदेश लिहिलेले दिसले. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगीबेरंगी माळा, झूल, आणि घुंगरांनी सजवले, पण त्यासोबतच त्यांनी आपल्या मागण्यांचे फलकही मिरवणुकीत झळकावले. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि "हर बोला, हर हर महादेव" च्या जयघोषासोबतच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाजही गावभर दुमदुमला.

No comments