यावल येथे त्या चिमुकल्याच्या हत्याचा निषेधार्ह सर्व धर्मीय मुक मोर्चा यावल तहसिलदार यांना दिले निवेदन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक...
यावल येथे त्या चिमुकल्याच्या हत्याचा निषेधार्ह सर्व धर्मीय मुक मोर्चा
यावल तहसिलदार यांना दिले निवेदन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील बाबुजीपुरा परिसरात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक व अमानुष घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. अवघ्या सहा वर्षांच्या हनान खान या निरागस बालकाचा निर्दयी खून करून त्याचे शरीर जाळल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या पाशवी कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज यावल शहरात शांततेत पण ठामपणे मुक मोर्चा काढण्यात आला
हनान खानचा खून करणारा आरोपी शेख शाहीद शेख बिस्मिल्ला हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर आज मयत बालकाच्या बाबुजीपुरा येथील घरापासून यावल तहसील कार्यालयापर्यंत सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत निषेध नोंदवला. मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला असला तरी प्रत्येक नागरिकाच्या मनात असलेला आक्रोश आणि वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती.
तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देत आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यास कठोर शिक्षा व्हावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. निवेदनात हे देखील नमूद करण्यात आले की, अशा क्रूर गुन्हेगारांना वेळेवर शिक्षा झाली नाही, तर समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल. या मोर्चामध्ये यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी, हाजी इकबाल खान काँग्रेसचे शहर सरचिटणीस शेख फारुक शेख युसुफ शिवसेनेचे विजय पंडित माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, अनिल जंजाळे माजी नगरसेवक समीर मोमीन पराग सराफ नरेंद्र शिंदे रफिक टेलर करीम मेंबर सुरेश कुंभार हुसेन तडवी पिंटू कुंभार आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हनानचा खून ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची वेदना आहे. निष्पाप बालकावर झालेल्या या अत्याचाराची कोणतीही कल्पनाही सामान्य माणसाला सुन्न करणारी आहे. त्यामुळे याप्रकरणी वेळीच कठोर पावले उचलून, समाजात कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास टिकवणे हीच सध्याची काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ही घटना यावल शहराच्या इतिहासातील काळा दिवस ठरावा अशी असून, नागरिकांनी अत्यंत संयम बाळगून शांततेच्या मार्गाने आपला विरोध व्यक्त केल्याचे विशेष उल्लेखनीय ठरले. आता साऱ्या शहराचे लक्ष प्रशासनाकडे लागले असून, आरोपीला तातडीने कठोर शिक्षा होईल का, याकडे सर्वांची नजर आहे.


No comments