adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई किल्ला परिसरात किसान महाविद्यालयाच्या रासेयो एककाचा स्वच्छता उपक्रम

  ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई किल्ला परिसरात किसान महाविद्यालयाच्या रासेयो एककाचा स्वच्छता उपक्रम.  पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई किल्ला परिसरात किसान महाविद्यालयाच्या रासेयो एककाचा स्वच्छता उपक्रम. 


पारोळा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक पर्यटन दिन आणि स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पारोळा येथील  किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि पारोळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पारोळा येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या राणी लक्ष्मीबाई किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमास स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या अभियानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून स्वच्छतेशिवाय आरोग्य, पर्यावरण आणि पर्यटनाचा विकास शक्य नसल्याचे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजहिताच्या अशा उपक्रमांमध्ये सक्रिय राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आजची तरुण पिढी ही केवळ भविष्य नव्हे तर वर्तमान बदलण्याची ताकद ठेवते. त्यामुळे त्यांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जपणे याकडे अधिक लक्ष द्यावे याची पुष्ठीही जोडली. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी प्रस्ताविक करतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. महाराजांनी स्थापन केलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. हे स्थळे म्हणजे केवळ ऐतिहासिक वारसा नसून, ती देशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण परंपरेचे प्रतीक आहेत. पर्यटनाची खरी ओळख ही स्वच्छतेतूनच होते. जर आपण पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवली तरच परदेशी आणि देशी पर्यटक आकर्षित होतात. त्यामुळे स्वच्छता आणि पर्यटन यांचा परस्पर संबंध अतूट असल्याचे सांगितले

 स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून किल्ला परिसरातील गवत काढणे, प्लास्टिक व घनकचरा गोळा करणे, तसेच परिसर स्वच्छ व आकर्षक बनविण्याचे काम केले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता हीच सेवा, पर्यटनस्थळे स्वच्छ राखूया, इतिहास जपूया अशा घोषणाही दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्वच्छतेचा संकल्प घेतला. त्यांनी गावपातळीवर, शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्याचे ठरविले. या उपक्रमामुळे राणी लक्ष्मीबाई किल्ला परिसराचे सौंदर्य अधिक खुलले असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि इतिहास व वारसा स्थळांविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली. अशा उपक्रमांमुळे स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागून समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते असे मत प्रा. शिरीष सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. या स्वच्छता उपक्रमासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, स्वच्छता  तथा पर्यावरण दूत शुभम कंखरे आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments