भारतीय ज्ञानपरंपरा भारताचा समृद्ध- संपन्न सांस्कृतिक वारसा प्रा. शिरसाठ मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक...
भारतीय ज्ञानपरंपरा भारताचा समृद्ध- संपन्न सांस्कृतिक वारसा प्रा. शिरसाठ
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर- येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या इतिहास विभागामार्फत “भारतीय ज्ञानपरंपरा” या विषयावर दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. हेमंत महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, प्राचीन भारतातील कला, स्थापत्य कला, चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला आणि विज्ञान तंत्रज्ञान यांचा सहसंबंध स्पष्ट करताना, भारत प्राचीन काळात वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीपथावर होता, असे मत प्रतिपादित केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस.एन. डी.टी.महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. डॉ. दीपक शिरसाठ यांनी “भारतीय ज्ञानपरंपरा” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, प्राचीन काळातील वेद, उपनिषद, आरण्यके,रामायण, महाभारत, अर्थशास्त्र,अष्टाध्यायी, लीलावती यांसारख्या प्राचीन ग्रंथांतून अधोरेखित होत असलेली भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. प्राचीन काळातील तक्षशिला, नालंदा,काशी,कांची विद्यापीठांविषयी सखोल मार्गदर्शन केले. ही विद्यापीठे एवढी प्रगत होती की, या विद्यापीठात परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. या विद्यापीठात आयुर्वेद,धनुर्विद्या, वास्तुशास्त्र,शिल्पकला, संगीत, नृत्य,राजकारण, गणित, अर्थशास्त्र, व्याकरण इत्यादी विषय शिकविले जात असत,. प्राचीन भारतीय गुरु-शिष्य परंपरा देखील महान होती. असा समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतात आपला जन्म झालेला आहे हे आपले सौभाग्य असून हा समृद्ध भारतीय ज्ञान परंपरेचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. पी.एस. प्रेमसागर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दत्तात्रय कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. इस्माईल शेख,प्रा.डॉ.दीपक बावस्कर व प्रा. नितीन हुसे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

No comments