🛕 साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्णभेट सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हे...
🛕 साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण
मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्णभेट
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि९):-श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या अहिल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी आज एक अद्वितीय सुवर्णभेट अर्पण करण्यात आली. मुंबई-ठाणे येथील नामांकित उद्योजक आणि साईबाबांचे परमभक्त धरम कटारिया यांनी तब्बल 74 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ताट साईबाबांना अर्पण करून भक्तीतून वेगळे उदाहरण घालून दिले आहे.साईबाबांच्या पवित्र चरणी अर्पण करण्यात आलेल्या या ताटाचे वजन 660 ग्रॅम असून त्यावर ‘ॐ साईराम’ आणि ‘स्वस्तिक’ अशी सुंदर नक्षी कोरलेली आहे. माध्यान्ह आरतीवेळी भक्तीभावाने ही सुवर्णभेट साईबाबांच्या समाधीस्थळावर अर्पण करण्यात आली.धरम कटारिया हे 1970 पासून साईबाबांचे निष्ठावंत भक्त असून, ते दर महिन्याला शिर्डीत येऊन समाधीचे दर्शन घेतात. साईबाबांच्या चरणी काहीतरी अनोखे आणि भक्तिपूर्ण सुवर्णदान करावे, अशी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची दीर्घकाळ इच्छा होती.कटारिया यांच्या कार्यालयात साईबाबांची प्रतिमा असून, एक दिवस अगरबत्ती स्टॅन्ड ठेवण्यासाठी असलेल्या ताटावर त्यांची नजर गेली आणि त्यातूनच ही प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी खास नक्षीकाम असलेले सोन्याचे ताट तयार करून साईबाबांच्या चरणी अर्पण करण्याचा निश्चय केला.भक्तिभावाने आणि आनंदाश्रूंनी भरलेल्या वातावरणात हे सुवर्ण ताट साईबाबांच्या मंदिरात अर्पण करण्यात आले. शिर्डी संस्थान आणि उपस्थित भाविकांनी कटारिया यांच्या या श्रद्धादानाचे मनःपूर्वक स्वागत केले.

No comments