मनवेल आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप – दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करण्याची माग...
मनवेल आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप – दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करण्याची मागणी व उपोषणाचा इशारा..
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल (जि जळगाव) – उज्वल शिक्षण संस्था अमरावती शाखा अंतर्गत चालवली जाणारी कै. व्ही. व्ही. तांबट अनुदानित आश्रमशाळा, मनवेल येथे घडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या गंभीर घटनांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी या आश्रमशाळेत शिकत असलेला फुलसिंग पहाडसिंग बारेला (इयत्ता 3री) हा विद्यार्थी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर पुन्हा दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंकी भीमा बारेला या विद्यार्थिनीचा निकृष्ट आहार व आरोग्य तपासणीतील हलगर्जीपणामुळे छत्रपती संभाजीनगर येथील घोटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दोन निरपराध विद्यार्थ्यांच्या मृत्यूकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार व मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक, अधीक्षक व संबंधित शिक्षक–कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेकडून प्रशासनाला चेतावणी देण्यात आली आहे की, जर या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर मनसे व मनसे विद्यार्थी सेना कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, तसेच दिलीप कोळी, तुषार तायडे, मोहसीन खान, साबीर शेख, अकील खान, आकाश ओहरा, तेजस सपकाळे, पंकज तायडे, ज्ञानेश्वर बोरनारे, दिलीप मुरलीधर कोळी, युवराज कोळी, लक्ष्मण कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments