अखेर एकबोटेवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ... वंचित बहुजन आघाडीची ताकद पुन्हा अधोरेखित निलंगा (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गा...
अखेर एकबोटेवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
वंचित बहुजन आघाडीची ताकद पुन्हा अधोरेखित
निलंगा (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या आणि कथित गोरक्षक संघटनेचा प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद एकबोटे याच्याविरुद्ध अखेर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि निषेधाचे वारे उठवणारी ठरली असून, वंचित बहुजन आघाडीने आपल्या एकजुटीच्या शक्तीने पुन्हा एकदा सामाजिक न्यायासाठी लढण्याची आपली परंपरा दाखवून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यात कथित गोरक्षकांनी एका गरिब मातंग नागरिकाच्या वाहनावर दगडफेक करून त्याचे गंभीर नुकसान केले. त्या नागरिकाला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला.
ही माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर, तसेच आघाडीचे अनेक कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित व्यक्तीला दिलासा दिला आणि पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर कथित गोरक्षकांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना जबाब विचारला असता त्यांनी आपला “आका” दंगलखोर मिलिंद एकबोटे याला फोन लावला. त्या वेळी निलंगा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) घटनास्थळाशी संपर्कात होते. त्यांनी मंजुषाताई निंबाळकर यांना फोन देत सांगितले की, “मिलिंद एकबोटे बोलत आहेत, आपण त्यांच्याशी बोला.”
फोनवर संवाद सुरू होताच मिलिंद एकबोटे यांनी मंजुषाताई निंबाळकर या एक महिला जिल्हाध्यक्षा असूनही अत्यंत अर्वाच्च, अपमानास्पद आणि असभ्य शब्दांत बोलणे सुरू केले. ताई निंबाळकर यांनी शांततेने आणि सन्मानपूर्वक बोलण्याचा प्रयत्न केला, पण एकबोटे यांनी आपली भाषा आणखीनच खालच्या पातळीवर नेली. या प्रसंगामुळे उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतापले. परंतु, त्यांनी संयम राखत “कायद्याचा मार्गच योग्य” या भूमिकेतून ठामपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत मंजुषाताई निंबाळकर यांनी तत्काळ निलंगा पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली.त्यानंतर एकबोटेवर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम ३५२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे..ही कारवाई झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद, उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘महिलांचा सन्मान सर्वोच्च’
घटनेनंतर प्रतिक्रिया देताना मंजुषाताई निंबाळकर म्हणाल्या, “मी महिला आहे, आणि एका जबाबदार राजकीय संघटनेची जिल्हाध्यक्षा आहे. अशा जबाबदार पदावर असलेल्या महिलेशी अर्वाच्च भाषेत बोलणे हे समाजातील महिलांचा अपमान आहे.आम्ही कायद्यावर विश्वास ठेवतो आणि न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू.”
वंचित आघाडीचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानताना सांगितले की, “दंगलखोर मानसिकता असणाऱ्यांना कायद्यानेच उत्तर दिले जाईल. वंचित बहुजन आघाडी प्रत्येक अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहील.”
सामाजिक संदेश
या घटनेमुळे समाजात एक ठोस संदेश गेला आहे —
“कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही आणि महिलांच्या सन्मानावर कुणालाही गदा आणू देणार नाही.”

No comments