कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी चोपडा प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कठोरा ता. ...
कठोरा ग्रामपंचायतीकडून घरकुल जागावाटपात विलंब; भीम आर्मीची आमरण उपोषणाची चेतावणी
चोपडा प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कठोरा ता. चोपडा, जि. जळगाव येथील आदिवासी, निराधार, बेघर व भूमिहीन नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागावाटप करण्यात यावी, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे ग्रामपंचायत कठोरा , गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष मुबारक नजबुल तडवी तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार राहुल जयकर यांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाच्या मालकीची जमीन तातडीने पात्र लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशानुसार घरकुलासाठी जमीन वाटपाची कार्यवाही करण्यास ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आलेले आहे. तरीदेखील, ग्रामपंचायत कठोरा येथे संबंधित कार्यवाही करण्यात होत असलेला विलंब हा अन्यायकारक व शासनविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, येत्या सात दिवसांत जर जागावाटपाची कार्यवाही न केल्यास, भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांसाठी ग्रामसेवक सौ. मनीषा महाजन, सरपंच श्री. एकनाथ कोळी आणि ग्रामपंचायत सदस्य यांना जबाबदार धरले जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन आणि बेघर नागरिकांच्या समस्येला न्याय मिळावा, या हेतूने दिलेले हे निवेदन प्रशासनास जाग आणणारे ठरेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments