वंचित बहुजन आघाडीचा आरोप; 'कोट्यवधी रुपयांचा निधी गायब ? निलंगा प्रतिनिधी उत्तम माने (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा तालुक्यातच ...
वंचित बहुजन आघाडीचा आरोप; 'कोट्यवधी रुपयांचा निधी गायब ?
निलंगा प्रतिनिधी उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघात मंजूर करण्यात आलेल्या विकास निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा मंजू हिरालाल निंबाळकर यांनी केला आहे. या निधीचा काही भाग थेट माजी मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर निवासस्थानाजवळील यांच्या शिवाजीनगर परिसरात करण्यात आलेल्या कामांसाठी वापरण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार निलंग्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच निधीचा हिशेब आणि प्रत्यक्ष कामाची माहिती लपविण्याचा प्रयत्न नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रकरणात माजी मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी स्वतः प्रशासनाला हाताशी धरल्याचा आम्हाला ठोस पुरावा आहे.
त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वापर कुठे आणि कसा झाला याचा तपशीलच गायब करण्यात आला आहे. निंबाळकर यांनी असा दावा केला की, निलंगा तालुक्यात अनेक प्रलंबित विकासकामांना निधी न देता, निवडक भागांमध्ये कामे दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. डॉ. हिरालाल निंबाळकर यांनी सुद्धा निलंगा-तळीखेड रस्त्याबाबत तक्रार केली आहे.
पारदर्शक चौशीची होत आहे मागणी
या संपूर्ण घडामोडींमुळे निलंगा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मंत्री आशिष शेलार यांच्या दौऱ्यादरम्यान या विषयावर चर्चा रंगण्याची आणि विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनीदेखील या आरोपांची दखल घेऊन निधीच्या गैरवापराबाबत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
No comments