विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेत धुळ्याचे निर्विवाद वर्चस्व, १४, १७ व १९ वर्ष मुले व मुलींनी पटकविले विजेतेपद धुळे, अहिल्यानगर व गोंदीया येथे ह...
विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेत धुळ्याचे निर्विवाद वर्चस्व, १४, १७ व १९ वर्ष मुले व मुलींनी पटकविले विजेतेपद
धुळे, अहिल्यानगर व गोंदीया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळ्याच्या सहा संघांची निवड झाली.
धुळे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे (दि.४) येथील साक्री रोडवरील गरुड मैदानावर क्रीडा संचलनालयाच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या तांत्रिक सहकायनि नुकतीच नाशिक विभागीय शालेय नेटवॉल क्रीडा स्पर्धा झाली. या स्पर्धेत शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी शाळेच्या संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने १४, १७ व १९ वर्ष वयोगटातून मुले आणि मुलींच्या सहाही गटांमध्ये विजेतेपद पटकावून विभागीय स्तरावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे धुळ्याच्या सहा संघांची अहिल्यानगर व गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेत नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यातील एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खो खो खेळाडू प्रमोद सोनार यांच्या हस्ते झाले. क्रीडाधिकारी मनोहर पाटील, नेटबॉलचे राज्य उपाध्यक्ष योगेश वाघ, बास्केटबॉल क्रीडा मार्गदर्शक मुद्रा अग्रवाल, जिल्हा खो खो सहसचिव अविनाश वाघ, शुटींगबॉल सचिव महेंद्र गावडे, प्रशांत कांगणे, अक्षय हिरे, समाधान भामरे, प्रा. नितीन कवाडे, दत्तात्रय सोनार, प्रणिल कासोदकर यांची उपस्थिती होते. पंच अधिकारी म्हणून निलेश चौधरी, आदित्य दहातोंडे, सनी जाधव, कार्तीक रेवाळे, निरज साव, विवेक पाटील, भावेश गिरासे, साक्षी पाटील, रोशनी भदाणे, नेहा ठाकूर यांनी काम पाहिले
चौदा वर्षे मुले गटात धुळे मनपा संघाने विजेतेपद मिळवले, तर जळगाव जिल्हा संघ उपविजेता ठरला आणि धुळे जिल्हा संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्ष मुले गटात धुळे मनपा विजेता ठरला, तर धुळे जिल्हा संघ उपविजेतेपदावर राहिला. तिसरे स्थान नाशिक जिल्हा संघास मिळाले. १९ वर्ष मुले गटात धुळे मनपाने बाजी मारली, तर नाशिक मनपा संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक पुन्हा धुळे जिल्हा संघाला मिळाला.
चौदा वर्षे मुली गटातही धुळे मनपा संघाने विजय मिळवला. धुळे जिल्हा संघ उपविजेता ठरला, तर नाशिक मनपा संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्ष मुली गटात धुळे मनपा संघाने विजेतेपद मिळवले. नाशिक मनपा संघाने उपविजेतेपद मिळवले, तर तिसऱ्या स्थानी धुळे जिल्हा संघ राहिला. १९ वर्ष मुली या गटातही धुळे मनपा संघाने वर्चस्व राखत विजेतेपद पटकावले. नाशिक मनपा संघ उपविजेता ठरला आणि धुळे जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

No comments