“या पाखरांनो परत फिरा… मी आज तुमची वाट पाहत आहे, हो… मी मराठी शाळा बोलतेय!” मी एक मराठी शाळा आहे. काळाच्या ओघात थकलेली, पण अजूनही आशेने उभ...
“या पाखरांनो परत फिरा…
मी आज तुमची वाट पाहत आहे, हो… मी मराठी शाळा बोलतेय!”
मी एक मराठी शाळा आहे. काळाच्या ओघात थकलेली, पण अजूनही आशेने उभी असलेली. माझ्या भिंती दगडी आहेत, छप्पर कौलारू आहे, पण माझ्या वर्गखोल्यांमध्ये आजही ज्ञानाचा, संस्कारांचा आणि माणूस घडवण्याचा सुगंध दरवळतो.
एकेकाळी माझ्या अंगणात हसणारी, खेळणारी, धावणारी पाखरं होती. “आई… आई…” म्हणत धावत येणारी लेकरं, पाटीवर पेन्सिल ने “अ आ इ” गिरवणारे हात, आणि शिक्षकांच्या डोळ्यातील आपुलकी, हे सगळं माझं वैभव होतं.
आज मात्र…
माझ्या वर्गखोल्या शांत आहेत. इंग्लिश स्कूलच्या झगमगाटात माझी पाखरं दूर गेली. मी दोष कुणाला देत नाही, कारण प्रत्येक पालक आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असं स्वप्न पाहतो. पण…
एक प्रश्न मला छळतोय—
इंग्रजी आली म्हणजे संस्कार गेले का?
भाषा बदलली म्हणजे माती सुटली का?
माणूस घडवणारी शाळा
फक्त इंग्रजी माध्यमाचीच असते का?
माझ्या पाठीमागे आणि पुढे नव्या इमारती उभ्या राहिल्या, पण मी अजूनही जुन्याच कपड्यात आहे. थोडी रंगरंगोटी, थोडी सजावट, ग्रंथालय, संगणक, खेळाचे साहित्य, स्वच्छ शौचालय,आणि मुलांना आकर्षित करणारे वातावरण—
हे सगळं आज माझ्यासाठी स्वप्नच आहे.
माजी विद्यार्थ्यांनो… ज्यांच्या पायात उभं राहण्याचं बळ मी दिलं, ज्यांना अक्षरओळख करून दिली, आज तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, व्यापारी झाला आहात. एकदा तरी मागे वळून पाहा…
मी अजूनही तुमची वाट पाहतेय.
गावातील लोकप्रतिनिधींनो… विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारती नाहीत, विकास म्हणजे शाळा जगणं. मराठी शाळा टिकली, तरच मराठी माणूस टिकेल. थोडं लक्ष, थोडा निधी, आणि थोडी आपुलकी— मला नवसंजीवनी देऊ शकते.
आज गरज आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची. माझं रूप बदलण्यासाठी नाही, माझं भविष्य वाचवण्यासाठी. माझ्यात अजूनही दम आहे, माझ्या मातीमध्ये अजूनही ताकद आहे.
या पाखरांनो… परत फिरा. माझ्या अंगणात पुन्हा किलबिल होऊ द्या. मी अजूनही उभी आहे, आजही, उद्याही— तुमचीच वाट पाहत…
हो… मी मराठी शाळा बोलतेय!
शामसुंदर सोनवणे (पत्रकार) हातेड /चोपडा

No comments