चोपडा शहरातील रेशन दुकान क्र. ८ विरोधात तक्रार; कमी धान्य व दमदाटीचा आरोप चोपडा प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरातील रेशन...
चोपडा प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील रेशन दुकान क्रमांक (८) येथे रेशन वाटप करताना रेशनधारकांना कमी प्रमाणात गहू व तांदूळ दिले जात असल्याचा तसेच अरेरावी व दमदाटीची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात रेशनधारकांनी तालुका पुरवठा अधिकारी किरण मेश्राम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रेशन दुकानदार दारूच्या नशेत आरडाओरडा करत रेशनधारकांशी धमकीच्या भाषेत बोलतो. प्रत्येक रेशन कार्डमागे धान्य कमी देण्यात येत असून याबाबत विचारणा केल्यास अपमानास्पद वागणूक दिली जाते, अशी तक्रार रेशनधारकांनी केली आहे.
या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सय्यद मजहर व सय्यद जहांगीर यांनी मध्यस्थी करून दुकानदारास समजावण्याचा प्रयत्न केला असता, दुकानदाराने त्यांनाही उलटजबाबी देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आज रोजी चोपडा तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रेशन दुकान क्रमांक ८ विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. सदर तक्रारीमध्ये कमी धान्य वाटप, दारू पिऊन गैरवर्तन करणे तसेच बेकायदेशीररीत्या गहू व तांदूळ विक्री केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी रेशनधारकांनी केली आहे.

No comments