थेपडे विद्यालय म्हसावदचा स्तुत्य उपक्रम: _चॉकलेटऐवजी ग्रंथालयाला पुस्तके भेट देऊन विद्यार्थिनींनी साजरा केला वाढदिवस_ जळगाव जिल्हा प्रतिनि...
थेपडे विद्यालय म्हसावदचा स्तुत्य उपक्रम:
_चॉकलेटऐवजी ग्रंथालयाला पुस्तके भेट देऊन विद्यार्थिनींनी साजरा केला वाढदिवस_
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाढदिवस म्हटला की चॉकलेट्स वाटणे, केक कापणे किंवा पार्टी करणे हे समीकरण आता रूढ झाले आहे. मात्र, याला फाटा देत म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता. जि. जळगांव या विद्यालयाने एक अनोखा आणि आदर्श पायंडा पाडला आहे. शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला बगल देत शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थिनी कुमारी दर्शना अमोल जोशी आणि कुमारी लावण्या दिलीप पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेला पुस्तके सुपूर्द केली. चॉकलेट्स खाऊन संपण्यापेक्षा पुस्तकांच्या रूपाने ज्ञान वाटल्यास ते कायमस्वरूपी टिकते, हा विचार या विद्यार्थिनींनी कृतीतून दाखवून दिला आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश दत्तात्रय बच्छाव, उपमुख्याध्यापक श्री. संदीप भंगाळे सर आणि ग्रंथपाल श्री. पवन राजू मोरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या या निर्णयाचे कौतुक केले.
मुख्याध्यापक श्री. बच्छाव सर यांनी सांगितले की, "अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव वाढते." या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर विद्यार्थ्यांनीही याचे अनुकरण करावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

No comments