वंचितची एन्ट्री रोखण्यासाठी सत्ता-पैशांचा वापर सौ.मंजुषा निंबाळकर लातूर दि.२३ उत्तम माने (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा नगरपरिषद ...
वंचितची एन्ट्री रोखण्यासाठी सत्ता-पैशांचा वापर सौ.मंजुषा निंबाळकर
लातूर दि.२३ उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या जनसमर्थनानंतरही पक्षाची नगरपरिषदेत एन्ट्री होऊ नये म्हणून सत्ता, पैसा आणि जातीय ताकदींचा वापर करून सुनियोजित कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या लातूर महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रभाग क्रमांक १० हा वंचितचा बालेकिल्ला असतानाही केवळ पराभव घडवण्यासाठी अपार शक्ती लावण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मतदानाच्या आधी व मतदानादिवशी महिलां-तरुणांच्या हातात पैसे देऊन मतदानावर प्रभाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला.
मिलिंद नगर प्रभागातील भाजपला मिळालेले मतदान हे प्रत्यक्षात वंचितचेच असल्याचा दावा करत, त्या बूथवरील आकडेवारी संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेदरम्यान EVM बंद पडणे, विलंब होणे, तसेच मशीन जमा करताना लाईट जाणे या घटना योगायोग नसून नियोजनबद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संशयास्पद बाबींवर आक्षेप नोंदवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संपूर्ण प्रकाराचा तपशील व आकडेवारी लवकरच पक्षप्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पराभव मान्य आहे, पण संघर्ष संपलेला नाही. वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही,” असा इशारा देत आगामी निवडणुकांत पक्ष नव्या ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. निलंगा शहरात रोजगारनिर्मितीचे प्रकल्प राबवून तरुणांना संधी देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शेवटी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले.या पत्रकार परिषदेस डॉ.हिरालाल निंबाळकर तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुजीब सौदागर इतर उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते...

No comments