८९ दिवसांत ३८०० किमी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण; मलकापूरचे पुंडलीक पाटील यांचा अद्भुत संकल्प अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गा...
८९ दिवसांत ३८०० किमी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण; मलकापूरचे पुंडलीक पाटील यांचा अद्भुत संकल्प
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हर हर नर्मदे या जयघोषात मलकापूर शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, विष्णूनगर येथील रहिवासी पुंडलीक ओंकार पाटील (वय ६०) यांनी अवघ्या ८९ दिवसांत ३८०० किलोमीटरची माता नर्मदेची पायी परिक्रमा पूर्ण करून आपल्या दृढ इच्छाशक्तीचा आणि निष्ठेचा आदर्श घालून दिला आहे.
पुराणांनुसार माता नर्मदेची परिक्रमा ही अत्यंत पुण्यफलदायी मानली जाते. ती सर्व पापांचा नाश करणारी व कुलाचा उद्धार करणारी असल्याची श्रद्धा आहे. याच श्रद्धेने प्रेरित होऊन पुंडलीक पाटील यांच्या मनात नर्मदा परिक्रमेचा संकल्प रुजला.
५ ऑक्टोबर २०२५ रोजी मलकापूर येथून ते मध्यप्रदेशातील पवित्र नगरी ओंकारेश्वर येथे पोहोचले. तेथून त्यांनी पायी नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांना या परिक्रमेचा कोणताही अनुभव अथवा सखोल माहिती नव्हती. मात्र माता नर्मदेच्या दर्शनाची तीव्र ओढ, अढळ श्रद्धा आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हा अवघड प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
परिक्रमेच्या काळात पुंडलीक पाटील दररोज ४० ते ५० किलोमीटर पायी चालत होते. अनेक नैसर्गिक अडचणी, हवामानातील बदल, शारीरिक थकवा असूनही त्यांनी आपला संकल्प ढळू दिला नाही.
१ जानेवारी २०२६ रोजी परिक्रमा पूर्ण करून ते मलकापूर येथील आपल्या निवासस्थानी परतले. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी त्यांचे भावनिक व उत्स्फूर्त स्वागत केले.
२ जानेवारी रोजी जुनेगाव येथे त्यांच्या सन्मानार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत पुंडलीक पाटील यांचा गौरव केला, तर महिलांनी आरती करून त्यांचे स्वागत केले. सायंकाळी पाटील यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. पुंडलीक ओंकार पाटील यांची ही नर्मदा परिक्रमा मलकापूरसह परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा, संयम आणि संकल्पशक्तीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.



No comments