आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आदर्श माध्यमिक विद्यालय...
आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदर्श माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देणारे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. सी. के. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव सौ. सुरेखा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. पाचवी ते सातवी हा पहिला गट आणि आठवी ते दहावी हा दुसरा गट अशा विभागणीद्वारे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एकूण १०८ विज्ञान उपकरणांची मांडणी विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने सादर केली. विविध वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग व उपयोजनांचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
या प्रदर्शनासाठी बालकवी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक विवेक चिंचोले व तुषार नाईक यांनी परीक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी व मूल्यमापन केले. त्यांच्या मार्गदर्शनात्मक सूचनांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक मा. सी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता व नवोन्मेषाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी मान्यवर अतिथींचे स्वागत केले.
उपकरणांच्या मूल्यमापनानंतर उत्तम उपकरणासाठी दोन्ही गटांतून प्रत्येकी दोन प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक मुकेश तोरवणे व पोपट पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजनामुळे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे विज्ञान प्रदर्शन अत्यंत यशस्वी ठरले.


No comments