सातारा एलसीबीच्या निरीक्षकपदी कोणाची वर्णी? घोडके की भुजबळ यांच्यात चुरस; नियुक्ती ठरतेय संवेदनशील संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा प्रति...
सातारा एलसीबीच्या निरीक्षकपदी कोणाची वर्णी? घोडके की भुजबळ यांच्यात चुरस; नियुक्ती ठरतेय संवेदनशील
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) निरीक्षक पदासाठी होणारी नियुक्ती सध्या चर्चेचा विषय ठरली असून, ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील बनली आहे. या पदासाठी नव्या निरीक्षकांची नियुक्ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर या जबाबदारीसाठी इच्छुक अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
एलसीबी निरीक्षकपद हे जिल्हा पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्हे उघडकीस आणणे, तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करणे ही जबाबदारी या विभागाकडे असते. विशेष म्हणजे, कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार एलसीबीला असल्याने या विभागाची भूमिका अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर या विभागाच्या कामाचा मोठा प्रभाव पडतो.
याच कारणामुळे एलसीबी निरीक्षक म्हणून काम करण्यासाठी पोलीस दलात नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते. गुणवत्ता, अनुभव व गुन्हे अन्वेषणातील कौशल्य यांचा विचार करूनच या पदासाठी अधिकाऱ्याची निवड केली जाते.
सध्या या पदासाठी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये नियुक्तीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून, अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ही नियुक्ती जिल्हा पोलीस प्रशासनासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही समतोल साधत निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे सातारा एलसीबीचा नवा निरीक्षक कोण होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

No comments