अहिल्यानगर..विजयाच्या जल्लोषातून वादावादी..चार जणांवर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल...
अहिल्यानगर..विजयाच्या जल्लोषातून वादावादी..चार जणांवर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला.प्रभाग क्रमांक ११ मधील विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्याच्या घरासमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले.याच घटनेतून विजयी व पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली. या पार्श्वभूमीवर नालेगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.याबाबत सविस्तर माहिती अशी की,शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.निकालानंतर प्रभाग ११ मधील विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. मात्र,जल्लोष करताना काही समर्थक थेट भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या कट्टर समर्थकाच्या घरासमोर पोहोचले आणि तेथे घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आले आणि नालेगाव परिसरात तणाव निर्माण झाला.दरम्यान, शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नालेगाव येथील लांडे गल्ली परिसरात काही तरुण आपसात भांडण करत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याला मिळाली.या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी चार जण एकमेकांच्या अंगावर धावून जात जोरदार वादावादी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,मात्र संबंधित तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.अखेर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

No comments