क्रिप्टोच्या आमिषात १० लाखांची उडाण! अहिल्यानगरातील तरुण व्यावसायिकाची राजस्थानच्या भामट्याकडून मोठी फसवणूक; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल ...
क्रिप्टोच्या आमिषात १० लाखांची उडाण!
अहिल्यानगरातील तरुण व्यावसायिकाची राजस्थानच्या भामट्याकडून मोठी फसवणूक; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरातील सर्जेपुरा परिसरातील एका तरुण व्यावसायिकाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात राजस्थानमधील एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.वसीम शब्बीर शेख (वय ३१, रा. साई अपार्टमेंट, बेलदार गल्ली, सर्जेपुरा, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या तरुण व्यावसायिकाचे नाव असून, नदीम यासीन खान (रा. सिकर रामगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी वसीम शेख हे खेळाच्या मैदानांचे बांधकाम व विकासकामांचे कंत्राट घेतात. जानेवारी २०२५ मध्ये त्यांची ओळख नदीम खान याच्याशी झाली होती. ओळख वाढल्यानंतर नदीमने ‘यूएसडीटी’ या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा व जलद नफा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी नदीमने वसीम यांना कमी कालावधीत काही रकमेवर चांगला परतावा देत विश्वास निर्माण केला.या विश्वासाच्या आधारे वसीम शेख यांनी पुढे गुंतवणूक वाढवली. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये वसीम यांनी पुन्हा १० हजार यूएसडीटी (भारतीय चलनानुसार सुमारे १० लाख रुपये) नदीम खान याच्या खात्यावर पाठवले. मात्र काही दिवसांनंतर वसीम यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता, नदीम खान याने विविध कारणे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.यानंतर काही दिवसांतच नदीम खान याने आपला मोबाईल फोन बंद केला आणि सर्व प्रकारचा संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसीम शेख यांनी सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्यात नदीम यासीन खान याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत असून, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments