धरणगाव येथे प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा प्रभातफेरी, ध्वजवंदन, संविधान वाचन व संगीत कवायतीने राष्ट्रभक्तीचे वातावरण धरणगाव प्रतिनिधी (संप...
धरणगाव येथे प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा
प्रभातफेरी, ध्वजवंदन, संविधान वाचन व संगीत कवायतीने राष्ट्रभक्तीचे वातावरण
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव तसेच आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून देशप्रेम, संविधानिक मूल्ये व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक एस. एन. चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येत राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच झेंडागीताचे सामूहिक गायन करण्यात आले. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
सकाळी विद्यालयातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी परिहार चौक, कोटबाजार, धरणी चौक, बालाजी मंदिर, अर्बन बँक, बसस्टॉप या मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा विद्यालयात दाखल झाली. प्रभातफेरीच्या प्रारंभी जेष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डी. जी. पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष तसेच इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी. के. पाटील, संचालक भरत पाटील, संचालक अश्विन पाटील, विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पाटील, प्रा. व्ही. जी. पाटील, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संदीपकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकात्मता व शौर्यभावना निर्माण व्हावी यासाठी बाबाजी मासुळ यांनी देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायतीचे आकर्षक प्रात्यक्षिक घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जेष्ठ क्रीडा शिक्षक डी. एन. पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा व संविधानाबद्दल आदरभाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यामुळे धरणगाव परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

No comments