मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी उघड्यावर, व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये; प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा अमोल बावस्कार बुलढ...
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी उघड्यावर, व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये; प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलाड यार्डमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालावर अन्याय होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजार समितीतील टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांचे धान्य साठवून ठेवण्यात येत असून, विक्रीसाठी आलेला शेतकऱ्यांचा शेतीमाल मात्र उघड्यावर ठेवण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी? असा सवाल उपस्थित झाला असून, या संपूर्ण प्रकरणाकडे बाजार समितीचे सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी या संदर्भात कृउबास सभापतींना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालतो, त्याच शेतकऱ्यांना बाजारात मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. बेलाड यार्डमध्ये शेतकऱ्यांचा विक्रीसाठी आणलेला शेतीमाल बाहेर टाकण्यात येत असून, त्याला पावसापासून किंवा उन्हापासून कोणतेही संरक्षण मिळत नाही. याउलट शेतकऱ्यांच्या मालासाठी उभारण्यात आलेल्या टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पोते रचून ठेवण्यात आले आहेत.
शेतकरी घाम गाळून पिकवलेला माल विक्रीसाठी बाजारात आणतात. मात्र त्याठिकाणी त्यांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून न देता, व्यापाऱ्यांना मात्र बाजार समितीच्या सचिवांच्या आशीर्वादाने सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणी बाजार समितीच्या सचिवांवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच टिनशेडमधील व्यापाऱ्यांचा माल त्वरित हटवून तो शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला आहे.


No comments