अंतुर्ली येथे चार गायी चोरीस; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, पोलिसांकडून तपास सुरू किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ल...
अंतुर्ली येथे चार गायी चोरीस; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, पोलिसांकडून तपास सुरू
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार गायी चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी अरविंद प्रभाकर पाटील यांच्या शेतातून झाली असून, या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी अरविंद पाटील यांचा मुलगा शेतात गेला असता, शेतातील ७ गायींपैकी ४ गायी दिसून आल्या नाहीत. याबाबत खात्री होताच अरविंद पाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन गायी चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी परिसरात व आजूबाजूच्या भागात शोधमोहीम राबवली. मात्र, अद्याप चोरीस गेलेल्या गायी मिळून आलेल्या नाहीत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सध्या चोरीस गेलेल्या चार गायींची किंमत सुमारे अडीच ते तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीही गावात एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. तसेच नुकत्याच झालेल्या अंतुर्ली येथील यात्रेदरम्यान एका महिलेची पर्स चोरीस गेल्याची घटना घडली होती. यामुळे गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच रात्रीच्या वेळी गावात नियमित पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी अंतुर्ली गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

No comments