आदि साहित्य पुरस्कार–२०२६’ ने कवी भिमराज पावरा यांचा सन्मान नाशिक : प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आदिवासी कला संस्कृती साहित्य अक...
आदि साहित्य पुरस्कार–२०२६’ ने कवी भिमराज पावरा यांचा सन्मान
नाशिक : प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी कला संस्कृती साहित्य अकादमी व संयुक्त आदिवासी युवा जागृती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे पार पडलेल्या पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलनात सातपुड्यातील महादेव दोंडवाडा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील कवी-लेखक भिमराज होजा-या पावरा यांना ‘आदि साहित्य पुरस्कार–२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पावरा यांनी आदिवासी पावरी बोलीभाषेत लिहिलेल्या “वातरा – आदिवासी पावरा संस्कृतीमधील लोककथा, भाग १” या पुस्तकाची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या कुसूमताई अलाम (गडचिरोली) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
भिमराज पावरा यांची आतापर्यंत एकूण सात पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात संशोधनात्मक लेखन, कवितासंग्रह, वैचारिक लेखन, लोककथा, हिंदी अनुवाद तसेच बालगटासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम पुस्तिका यांचा समावेश आहे. ते पावरी बोलीतील राठवी उपबोलीत लेखन करतात तसेच मराठी व हिंदी भाषेतही अनुवादक म्हणून कार्यरत आहेत.
संमेलनात परिसंवाद, महिला परिसंवाद, मुलाखत सत्र, खुले सत्र व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी हित, शिक्षण, साहित्य व संस्कृती यांचे लेखन अधिक समृद्ध व्हावे, याबाबत सकारात्मक दृष्टीकोन मांडण्यात आला.
कार्यक्रमास अध्यक्ष देवचंद महाले, सचिव चेतन खंबायत, भिकल्यादादा धिंडा (पद्मश्री), ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, प्रतिभा चौरे, विशाल भोये, प्राचार्य अशोक बागुल, मोतीराम देशमुख, डॉ. संतोष सुपे, भिमसिंग वळवी, प्रेम भंडारी, संतोष पावरा, सुनील पावरा आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे सातपुड्यातील आदिवासी साहित्य चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.



No comments