महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव जिल्हाध्यक्षपदी संदीप पाटील; सरचिटणीसपदी योगेश सनेर यांची निवड जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव जिल्हाध्यक्षपदी संदीप पाटील; सरचिटणीसपदी योगेश सनेर यांची निवड
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची नव्याने घोषणा करण्यात आली असून जामनेर येथील संदीप जगन्नाथ पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी, तर चोपडा येथील योगेश सनेर यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. तसेच अमळनेर येथील वाल्मिक मराठे यांची मार्गदर्शक नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथील अजिंठा विश्रामगृह येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, शिक्षक नेते माधवराव पाटील तसेच राज्य पदाधिकारी पुस्तके सर उपस्थित होते. बैठकीत TET प्रश्नासह विविध शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. येत्या ५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिक्षक महामंडळ सभेला सर्व संघटनांनी एकसंघपणे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांसाठीची TET परीक्षा रद्द करावी किंवा किमान गुणांची अट निश्चित करावी, तसेच जुनी पेन्शन योजना आणि इतर विविध मागण्यांसाठी एकजुटीने आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात संघटनेला नव्या उमेदीने बळ देण्यासाठी तडफदार व युवा नेतृत्वाची गरज व्यक्त करत संदीप पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. शिक्षक प्रश्नांवर अभ्यासू आणि प्रभावी भूमिका मांडणारे योगेश सनेर यांनी पुन्हा संघटनेत सक्रिय काम करावे, अशी मागणीही करण्यात आली. राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी लेखी पत्राद्वारे संदीप पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी व योगेश सनेर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर केली.
आपल्या मनोगतात त्यांनी जळगाव जिल्ह्याला स्वर्गीय हनुमंतरावजी पवार यांच्या कर्तृत्वाचा वारसा लाभलेला असल्याचे सांगत, नव्या कार्यकारिणीने शिक्षक प्रश्नांना वाचा फोडून जिल्ह्यात संघटनेचे गतवैभव पुनर्स्थापित करावे, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, प्राथमिक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण मधूकर पाटील, वाल्मिक मराठे, पदवीधर संघटनेचे डॉ. विजय बागुल, शिक्षक परिषदेचे सलीम शेख, शिक्षक भारतीय संघटनेचे सोमनाथ पाटील व अजय पाटील, शिक्षक सेनेचे नाना पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे, सरचिटणीस विपिन पाटील, तालुकाध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ग.स. सोसायटी व भुसावळ पतपेढीचे संचालक, प्राथमिक शिक्षक पेढीचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियुक्त्यांमुळे जळगाव जिल्ह्यात शिक्षक संघटनात्मक चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


No comments