चोपडा पंचायत समिती आवारात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन; २३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
चोपडा पंचायत समिती आवारात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन; २३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात असहकार व कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने चोपडा येथील पंचायत समिती आवारात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या वतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. ईश्वर जाधव यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांच्या सूचनेनुसार आंदोलनाची टप्प्याटप्प्याने रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने दि. १६ व १७ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून काम करणे व निवेदन सादर करणे, दि. १८ फेब्रुवारी रोजी कार्यालयासमोर शांततापूर्ण घोषणा देणे, दि. २० फेब्रुवारी रोजी निवेदनाचा पाठपुरावा करणे अशी भूमिका जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. २३ फेब्रुवारीपासून बेमुदत संपूर्ण कामबंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी धर्मेंद्र सूर्यवंशी, नितीन बिरारी, अनिता पाटील, संदीप पाटील, ज्योत्स्ना सनेर, गिरीश पाटील, गुणवंत देवराज, विजय झांबरे, नीलिमा बिऱ्हाडे, निराशा पाटील, रमाकांत खैरनार, विजेंद्र मोरे, तडवी मॅडम आदी कर्मचारी उपस्थित होते.



No comments