लातूर शहरात मटका बुक्कीवर धाड : १५ जणांविरुद्ध गुन्हा, १.४१ लाखांची रोकड जप्त.. लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ल...
लातूर शहरात मटका बुक्कीवर धाड : १५ जणांविरुद्ध गुन्हा, १.४१ लाखांची रोकड जप्त..
लातूर जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मटका बुक्की चालवणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात रोकड व साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकाने दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी शाहू चौक ते गंजगोलाई रोडवरील गोजमगुंडे कॉम्प्लेक्स येथे छापा टाकला. यावेळी मटका बुक्की चालवणारा विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १,४१,००० रुपयांची रोकड, ३ मोबाईल असा एकूण १,७५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान मिळालेल्या नोंदी व विजय लांडगे यांच्या कबुलीजबाबावरून गोविंद चंद्रसेन खाडप (पाटील) (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) हा मटका बुक्कीचा मुख्य मालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याने शहरातील विविध भागात एजंट नेमून मटका व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विजय लांडगे, गोविंद खाडप व त्यांच्या १३ एजंटांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८२/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि सोनकांबळे करीत आहेत. सदर कारवाईत नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील सपोनि श्रीराम माचेवाड, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला.
No comments